37th National Games 2023 : महाराष्ट्राची दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक! खो-खो दोन्ही गटात विजय
37th National Games 2023 : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साकारली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा ७२-२६ (मध्यंतर ३६-१२) असा धुव्वा उडवला. सामन्यात सुरवातीपासूनच महाराष्ट्राने वर्चग्स्व राखले होते. सुयश गरगटेने २ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवले, फैझांखा पठाणने २ मि. संरक्षण करून ८ गुण मिळवले, वृषभ वाघने २ मि. संरक्षण केले. तर कर्णधाराची खेळी करताना रामजी कश्यपने १ मि. संरक्षण करून तब्बल १२ गुण वसूल केले. तर आदित्य गणपुलेने १:५० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले व मोठ विजय निश्चित केला. तर पराभूत ओडिशाच्या विशाल ओरामने १.३० मि. संरक्षण करून ४ गुण मिळवले तर अर्जुन सिंघने १ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवत दिलेली लढत अपुरी ठरली. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर ४६-४० असा दणदणीत विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेने २.१०, १.३० मि. संरक्षण करत ८ गुणांची कमाई केली, प्रियांका भोपीने १.२२, १.५० मि. संरक्षण करत ४ गुण मिळवले. काजल भोरने आक्रमणात ८ गुण वसूल केले, गौरी शिंदेने १.२८ मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. तर पराभूत ओडिशाच्या माधुमिताने १.३६ मि. संरक्षण करत तब्बल १० गुण वसूल केले तर रंजिताने १.०८ मि संरक्षण करत ४ गुण मिळवत जोरदार लढत दिली. मात्र महाराष्ट्राने त्याची डाळ शिजू दिली नाही. पुरुषामध्ये केरळ व आंध्र प्रदेश तर महिलांमध्ये कर्नाटक व केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
सायकलिंग - चिन्मयला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या चिन्मय केवलरामानीने रोड सायकलिंगमधील ४१ किलोमीटर वैयक्तिक् टाइम ट्रायल प्रकारात कांस्यपदक पटकावले. या शर्यतीत चिन्मयने ५७ मिनिटे, ३०.११ सेकंद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला. या गटात कर्नाटकच्या नवीन जॉनने (५५ मिनिटे, १९.३२ सेकंद) सुवर्णपदक आणि तामिळनाडूच्या श्रीनाथने लक्ष्मीकांतने (५६ मिनिटे, ३२.०४ सेकंद) रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राचा आणखी एक स्पर्धक प्रणव कांबळे (१ तास, ०२ मिनिटे, २१.०८ सेकंद) या शर्यतीत १२वा आला.