एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहा चेंडूत सहा षटकार, युवराजच्या अभेद्य विक्रमाची दहा वर्षे
युवराजने आजच्याच दिवशी दहा वर्षांपूर्वी सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. आज दहा वर्षांनंतरही तो विक्रम अबाधित आहे.
मुंबई : युवराज सिंह म्हणजे भारतीय क्रिकेटचा प्रिन्स. भारतीय क्रिकेटच्या या राजकुमाराला टीम इंडियाची दारं आज बंद झाली आहेत. पण त्याच युवराजने गेल्या 17 वर्षांमध्ये वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये गाजवलेल्या पराक्रमांनी त्याचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे. युवराजच्या ट्वेन्टी ट्वेन्टीतल्या एका ऐतिहासिक कामगिरीला आज 10 वर्षे पूर्ण होत आहेत. ती कामगिरी जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा 2007 मध्ये जावं लागेल.
युवराजचा अभेद्य विक्रम
महेंद्रसिंग धोनीच्या षटकाराने टीम इंडियाला 2011 साली वन डेचा विश्वचषक जिंकून दिला. पण टीम इंडियाच्या या कामगिरीत युवराजचा वाटा हा सिंहाचा होता.
धोनीच्या टीम इंडियाने 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक जिंकला. तेव्हाही युवराजची कामगिरी मोलाची ठरली. याच विश्वचषकात युवीने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकण्याचा ऐतिहासिक पराक्रमही गाजवला होता.
युवराजच्या त्या विक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण झाले. 19 सप्टेंबर 2007 रोजी ट्वेन्टी ट्वेन्टीच्या पहिल्या विश्वचषकातला भारत वि. इंग्लंड हा सामना दक्षिण आफ्रिकेतल्या डरबनच्या किंग्समीडवर खेळवण्यात आला होता.
फ्लिन्टॉपची चूक ब्रॉडला भोवली
वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरच्या अर्धशतकांनी भारताला सतराव्या षटकांत तीन बाद 155 धावांची मजल मारून दिली होती. त्याच धावसंख्येवर युवराज फलंदाजीला आला. आल्या आल्या युवीचं लक्ष विचलित व्हावं म्हणून इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिन्टॉफने त्याला छेडण्याची चूक केली. अठराव्या षटकाअखेर फ्लिन्टॉफशी झालेल्या त्या शाब्दिक चकमकीने युवी इतका पेटून उठला की, तो फ्लिन्टॉफवर चाल करून गेला.
स्टुअर्ट ब्रॉडची धुलाई
कर्णधार धोनी आणि पंचांनी केलेल्या मध्यस्थीने तो वाद थांबला. पण युवराज शांत झाला नाही. त्याच्या मनात पेटलेल्या आगीची झळ बिचाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला बसली.
स्टुअर्ट ब्रॉडचा पहिला चेंडू युवराजने मिडविकेटच्या डोक्यावरून स्टेडियमच्या बाहेर मारला.
स्टुअर्ट ब्रॉडचा दुसरा चेंडू युवराजने फ्लिक करून स्क्वेअर लेगला षटकार वसूल केला.
स्टुअर्ट ब्रॉडचा तिसरा चेंडू युवराजने कव्हर्सच्या डोक्यावरून स्टेडियममध्ये धाडला.
स्टुअर्ट ब्रॉडने राऊंड द विकेट टाकलेला चौथा चेंडू चक्क फुलटॉस होता. युवराजला सलग चौथा षटकार ठोकण्यासाठी ती आयतीच भेट मिळाली.
सलग चार षटकारांनी हतबल झालेल्या स्टुअर्ट ब्रॉडचा पाचवा चेंडू युवराजने डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला.
स्टुअर्ट ब्रॉडचा सहावा चेंडू हा युवराजला षटकारांचंच निमंत्रण देणारा होता. त्याने डीप मिडविकेटच्या डोक्यावरून तोही चेंडू प्रेक्षकांमध्ये धाडून सहा चेंडूंत सहा षटकारांचा विक्रम साजरा केला.
एकाच षटकात वसूल केलेल्या 36 धावांनी युवराजने अवघ्या 12 चेंडूंमध्येच अर्धशतक साजरं करून दिलं. आज दहा वर्षांनंतरही युवराजचा ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधला तो वेगवान अर्धशतकाचा विक्रम अबाधित आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement