एक्स्प्लोर
हातपाय नसलेल्या चिमुरड्याचा प्रेरणादायी व्हिडिओ
हात पाय नसतानाही एका मिनिटात बाळ घसरगुंडीपर्यंत पोहोचलं आणि त्यानं बहिणीप्रमाणे घसरगुंडीवरुन खाली घसरण्याचा आनंद लुटला.
मुंबई : महिंद्रा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हात आणि पाय गमावलेल्या चिमुकल्याचं रांगणं पाहून कुणाचंही हृदय तीळतीळ तुटेल. मात्र व्हिडिओच्या अखेरच्या टप्प्यात चिमुरड्याने दाखवलेली हिंमत पाहून तुम्हाला कौतुक वाटल्यावाचून राहणार नाही.
व्हिडिओ सुरु होताच हात पाय नसलेल्या चिमुकल्याची हतबलता पाहून कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहण्याचं टाळालही. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या आनंद महिंद्रांचीही तीच अवस्था झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही चेहऱ्यावरचं निरागस हास्य कायम ठेवणाऱ्या मुलाला पाहून, त्याच्यावर अपंगत्व लादणारी नियतीदेखील खजिल झाली असेल.
आपल्या बहिणीला घसरगुंडी खेळताना पाहून, या गोंडस बाळालाही हा अनुभव घेण्याचा मोह आवरला नाही. हात-पाय नसल्यामुळे त्यानं पोटावर रांगत रांगत पहिली पायरी सर केली. या दोन वर्षाच्या जीवामध्ये एवढी जिद्द कुठून आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र हा व्हिडीओ शूट करणाऱ्या बाळाच्या आईचे शब्द ऐकल्यानंतर, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
दुसरी पायरी चढताना आईच्या काळजाचाही ठोका चुकला... काही झालं तरी आईचं हृदय ते... तिनं मदतीसाठी बाळाला विचारणा केली... आई विचारते 'डू यू नीड हेल्प?' मात्र बाळानं मदतीसाठी स्पष्ट नकार देत धीरोदत्त आईचा विश्वास सार्थ ठरवला.
हात पाय नसतानाही एका मिनिटात बाळ घसरगुंडीपर्यंत पोहोचलं आणि त्यानं बहिणीप्रमाणे घसरगुंडीवरुन खाली घसरण्याचा आनंद लुटला. आई आणि बाळामधलं हे मिनिटभराचं संभाषण जेवढं हृदयस्पर्शी आहे तेवढंच प्रेरणादायी.
म्हणूनच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा ट्विट करतात. 'सुरुवातीला मला व्हिडीओ बघण्याचं धाडस होत नव्हतं. मात्र व्हिडीओ पाहिल्यानंतर आत्मविश्वास उंचावल्याची भावना निर्माण झाली. यापुढे कोणतंही काम कठीण किंवा अशक्य आहे अशी तक्रार मी कधीच करणार नाही.'
https://twitter.com/anandmahindra/status/907256564641402880
महिंद्रा यांच्या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाल्यात तर हजारोंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ रीट्विट करताना अमिताभ बच्चन म्हणतात..
'खूपच प्रेरणादायक... सुरुवातीला थोडा हेलावलो... मात्र या आईचे प्रेरणादायी बोल नक्कीच ऐका'
https://twitter.com/SrBachchan/status/907473530068934657
लहान मोठ्या संकटांना आव्हान देतानाच अनेक जण अवसान गाळतात. परिस्थितीपुढे गुडघे टेकतात. मात्र एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं जाताना चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही न ठेवणाऱ्या बाळाचं कौतुक करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. तर काळजावर दगड ठेवून आपल्या मुलाला संकटाचा सामना करायला शिकवणाऱ्या आईचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement