न्यूयॉर्क : जागतिक लसीकरणाचा एक भाग म्हणून युनिसेफ या संघटनेनं कोविड-19 च्या लसीचे जागतिक स्तरावर खरेदी आणि वितरण करण्याचं जाहीर केलं आहे. जवळपास 170 हून अधिक देशांचा समावेश असणारी युनिसेफची ही लसीकरणाची मोहीम आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जलद मोहीम असणार आहे.
द युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स् फंड अर्थात युनिसेफ ही जगातली सर्वात मोठी लस खरेदी आणि वितरण करणारी संघटना आहे. या संघटनेतर्फे नियमित लसीकरणासाठी दरवर्षी सुमारे वेगवेगळे 2 अब्ज लसींचे डोस खरेदी करण्यात येतात.
युनिसेफ तिच्या कोवॅक्स सुविधेअंतर्गत पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेनच्या सहकार्याने कोविडच्या लसीची खरेदी आणि वितरण करणार आहे. तसेच कोवॅक्स सुविधेअंतर्गत भाग घेण्याचा हेतू व्यक्त केला आहे अशा 80 उच्च अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांसाठी युनिसेफ समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे.
युनिसेफ ही मोहीम जागतिक आरोग्य संघटना, गावी, सेपी, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक बँक, द बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि इतर काही भागिदारांच्या मदतीने राबवत आहे. कोवॅक्स सुविधा ही सगळ्या देशांसाठी खुली केली आहे जेणेकरुन भविष्यात कोणताही देश कोविड-19 ची लस मिळण्यापासून अलिप्त राहणार नाही.
ऑक्सिजन पुरवठ्यात 50 टक्के घट; पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे
जवळपास 28 लस उत्पादकांनी त्यांच्या वार्षिक लस उत्पादन योजनेची माहिती युनिसेफला कळवली आहे. त्यातून सामुहिकरित्या येत्या एक-दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करण्यात येणार असल्याची खात्री देण्यात आली आहे. असे असले तरी उत्पादकांनी यातील गुंतवणूक, क्लिनिकल ट्रायलचे यश, लस खरेदीसंबंधीचा आगावू करार, त्याला पुरवण्यात येत असलेला फंड , तसेच त्यावर असणारी वेगवेगळी नियंत्रणे अशा अनेक गोष्टींवर या मोहीमेचे यश अवलंबून असल्याचे संकेत दिलेत.
गावी या संंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेथ बर्कले म्हणतात की, " गावीच्या लसिकरणाच्या दोन दशकांच्या यशात युनिसेफचा मोठा वाटा आहे. या काळात 760 दशलक्षापेक्षा जास्त बालकांपर्यंत गावीच्या लसी पोहचल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 13 दशलक्ष बालकांचा जीव वाचवण्यात यश आलंय. युनिसेफने आम्हाला अर्ध्याहून जास्त जगापर्यंत पोहचण्यास मदत केली आहे."
ते पुढे म्हणाले की, कोवॅक्स कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर तज्ञ लोक आणि त्यांचा अनुभव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लसीची खरेदी आणि वितरण सुलभ आणि वेळेत होण्याची खात्री देता येईल.
कोवॅक्स हा कोविड-19 च्या लसीसंबंधीचा कार्यक्रम एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा कोविडच्या लसीचा विकास करणे आणि ती प्रत्येकापर्य़ंत पोहचवणे हा उद्देश आहे.