उस्मानाबाद : ऑक्सीजनचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने कोविडच्या काही रग्णांचे प्राण गेल्याचा धक्कादायक खुलासा ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या एजन्सींनं केला आहे. मागणी आणि पुरवठा ह्याचे गणित दिवसेंदिवस बिघडू लागले आहे. त्यामुळे काहीही करा पण आम्हाला द्रव रूपातले ऑक्सीजन द्या अशी मागणी ऑक्सीजन सिलेंडर मध्ये भरणारे आणि पुरवठा करणारे व्यावसायीक करत आहेत. त्यासाठी मंत्र्यांना साकडे घालत आहेत. ह्या मंडळींची झोप उडाली आहे.


उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तामलवाडी येथील ऑक्सिजन भरून देणार्‍या केंद्राला होत असलेला पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. पूर्वी दररोज 10 टन द्रव रूपातील ऑक्सिजन प्राप्त होत. मागील एप्रिलपासून हा पुरवठा पाच टनांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून नऊ तासांत द्रव रूपातील ऑक्सिजन तामलवाडीत पोहोचतो. दोन तासांत मोठ्या सिलेंडरमध्ये भरून 45 मिनिटांचा प्रवास करून रुग्णालयापर्यंत पोहोचतो. मात्र, रिकामे सिलेंडर परत या केंद्रावर जाण्यासाठी सहा तासांहून अधिक वेळ लागत आहे. व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे रिकामे सिलेंडर उपलब्ध होत नाहीत. परिणामी जलदगतीने ऑक्सिजन सिलेंडरचा पुढचा टप्पा प्राप्त होण्यास विलंब होत आहे. पुढील दोन महिन्यांत रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल, असा अंदाज आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आणि दुसरीकडे रूग्णसंख्या वाढीचा आलेख पाहता, पुढील दोन महिने अधिक जिकिरीचे जाणार, असे चित्र आहे.


राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांचा रोज नवा उच्चांक; अनेक तालुक्यात, गावात उत्स्फूर्त जनता कर्फ्यू


राज्यात चाकण, रायगड, नागपूर आणि मुंबई या चार ठिकाणी द्रव स्वरूपातील ऑक्सिजन तयार करण्याचे कारखाने आहेत. चाकण येथील आयनॉक्स या कारखान्यात प्रतिदिवस 190 टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजन निर्माण केला जातो. सलग नऊ तास प्रवास करून ऑक्सिजनचे टँकर तामलवाडी येथील केंद्रावर पोहोचतात. एप्रिलपूर्वी दर 24 तासाला 10 टन द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचे रूपांतर वायू स्वरूपात केले जात होते. एप्रिलपासून हे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले आहे. 150 किलोग्रॅम वजनाच्या एका सिलेंडरमध्ये ऑक्सिजन रूपांतरित करण्यासाठी साधारणतः सव्वा मिनिटाचा कालावधी लागतो.


एका गाडीतून 90 सिलेंडरची वाहतूक सध्या केली जात आहे. 90 सिलेंडर भरण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. सध्या उस्मानाबाद येथील सरकारी दवाखान्यासाठी 250 आणि खासगी दवाखान्यांसाठी 150, असे 400 मोठे सिलेंडर तामलवाडी येथून भरून पाठविले जातात. एकावेळी 32 सिलेंडर भरता येतील, अशा दोन ओळी आहेत. म्हणजे 64 सिलेंडर एकावेळी भरण्याची प्रक्रिया सुरू असते. सलग 24 तास हे काम सुरू आहे. लातूर येथील विजय गिल्डा यांचे हे केंद्र आहे. रात्रंदिवस पाच मजूर, पाच चालक, तीन कार्यालयीन कर्मचारी आणि एक सुरक्षारक्षक हे काम करीत आहेत. दोन तासांत सिलेंडर भरणे, 45 मिनिटांचा प्रवास, अशा अवघ्या पावणेतीन तासात सर्व प्रक्रिया करून ऑक्सिजन सिलेंडर उस्मानाबाद शहरात दररोज पोहोचविले जातात. रिकामे झालेले हेच सिलेंडर या केंद्रावर परत करण्यासाठी मात्र आरोग्य यंत्रणेला सहा तासाहून अधिक अवधी लागत आहे. रिकामे सिलेंडर नसल्यामुळे पुढील सर्व प्रक्रियेचा खोळंबा होत आहे.


वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द होणार! राज्य सरकारचा अनेक वर्षांच्या मागणीला हिरवा कंदिल?


द्रव स्वरूपातील ऑक्सिजनप्रमाणेच हवेमधून ऑक्सिजन गोळा करण्याचाही स्वतंत्र प्रकल्प लातूर येथे कार्यरत आहे. तामलवाडी येथे केंद्र चालविणारे गिल्डा यांच्याच तो मालकीचा आहे. पूर्वी हवेमधून ऑक्सिजन गोळा करण्याचा हा प्रकल्प तामलवाडी येथेच कार्यरत होता. सततच्या वीज समस्येमुळे त्यांनी हा प्रकल्प लातूर येथे स्थलांतरित केला. कोणत्याही कच्च्या मालाची गरज नसताना हवेतून ऑक्सिजन गोळा करण्याच्या या प्रकल्पातून दररोज 400 सिलेंडर भरले जात आहेत आणि या प्रकल्पाची एकूण निर्मिती किंमत 55 लाख रूपयांच्या घरात असल्याची माहिती गिल्डा यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात एक टन क्षमतेचे द्रव स्वरूपातील ऑक्सिजन टँक उभा करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहता जिल्हा रूग्णालयातील या टँकला अपेक्षित पुरवठा होणार का? हा महत्वाचा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.


दर मंगळवारी ऑक्सिजन भरणा केंद्र बंद


मुळात ऑक्सिजनचा पुरवठा अपेक्षेपेक्षा 50 टक्क्यांनी घटला आहे. त्यात दररोज वीजेची समस्या निर्माण होत असल्याने द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचे वायूमध्ये रूपांतर करण्यास अनेक अडथळे येत आहेत. दर मंगळवारी तामलवाडी आणि परिसरात वीजेचे भारनियमन असल्यामुळे सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे हे केंद्र चक्क बंद असते. त्यामुळे आठवड्यातील केवळ सहा दिवसच येथून ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा जिल्हा रूग्णालयाला केला जात आहे. पुढील दोन महिन्यांत अडीच हजारांहून अधिक ऑक्सिजन खाटांची आवश्यकता भासेल, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. सध्या उपलब्ध होत असलेले द्रव स्वरूपातील ऑक्सिजन तामलवाडी येथील केंद्राची क्षमता, दररोजची वीज समस्या आणि मंगळवारचे भारनियमन यामुळे भविष्यात ऑक्सिजनअभावी रूग्ण दगावण्याची भीती वर्तविली जात आहे.


Oxygen Cylinder Shortage | पुणे, नाशिक, नागपुरात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा