नवी दिल्ली: कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबतीत आता भारताने ब्राझीललाही मागे टाकलं आहे. आता भारत अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात विक्रमी 90,632 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 1065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या सर्वाधिक 86,432 केसेस समोर आल्या होत्या. देशात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 41 लाखांवर पोहोचलीय तर ब्राझीलमध्ये रुग्णांची संख्या 40 लाखांच्या जवळ आहे.


देशात कोरोना एकूण बाधितांची संख्या आता 41 लाख 13 हजार इतकी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 70,626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 8 लाख 62 हजार इतकी झाली असून एकूण 31 लाख 80 हजार रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येशी तुलना करता बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे तिप्पटीहून जास्त आहे.


आयसीएमआरच्या अहवालानुसार कोरोना संबंधित 54 टक्के केसेस या 18 ते 44 वयोगटातील आहेत तर कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंपैकी 51 टक्के मृत्यू हे 60 वर्षांवरील लोकांचे आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत  देशात जवळपास 4 करोड 88 लाख सँपल टेस्ट केले गेले आहेत. त्यामध्ये बाधितांचे प्रमाण हे 7 टक्क्यांहून कमी आहे.


12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संक्रमणातून बरे होण्याचा दर हा 77 टक्क्यांहून अधिक आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील आहेत. देशात ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे त्यात दिल्ली (89 टक्के), बिहार (88टक्के), तामिळनाडू (86टक्के), पश्चिम बंगाल (83टक्के), राजस्थान (82टक्के), गुजरात (81टक्के) यांचा समावेश आहे.


मृत्यू दरात घट


देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी वाढ होत असली तरी मृत्यूदरात मात्र सातत्यानं घट होताना दिसतेय. देशातील कोरोनाचा मृत्यू दर आता कमी होवून तो 1.72 टक्क्यांवर आलाय. ही दिलासादायक बातमी आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या सक्रिय रुग्णाची संख्यादेखील कमी होवून ती आता 21 टक्क्यांवर पोहोचली आहे.


सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक येतो. महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक बाधितांचा दवाखान्यात उपचार सुरू आहे. त्यानंतर तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगालचा नंबर येतो. या पाच राज्यांत कोरोनाची सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या आहे. सक्रिय रुग्ण संख्येच्या बाबतीतही भारताचा जगात दुसरा क्रंमाक लागतो.