(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine Russia War : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर निशाणा साधत रशियाने क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप
Ukraine Russia War रशियाने कथितरित्या युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर निशाणा साधत क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान आज दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
Ukraine Russia War : युक्रेन आणि रशियामधील संघर्ष आणखी वाढला आहे. रशियाने कथितरित्या युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर निशाणा साधत क्षेपणास्त्र डागले होते. परंतु वायु रक्षा प्रणालीद्वारे हा हल्ला रोखण्यात आला. मात्र याच दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चेची फेरी होणार आहे. दोन्ही देशांमध्ये आज चर्चा होईल आणि त्यामधून काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने 'द कीव इन्डिपेन्डंट'च्या हवाल्याने ट्वीट केला आहे की, "रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केला, रेल्वे स्टेशनजवळ ढिगारा आढळला. रशियन क्षेपणास्त्र कथितरित्या संरक्षण मंत्रालयाला लक्ष्य करत होतं. वायु सुरक्षा प्रणालीद्वारे ते क्षेपणास्त्र निकामी केलं आणि त्याचा ढिगारा कीवच्या मुख्य रेल्वे स्टेशनजवळ कोसळला : कीव इन्डिपेन्डंट"
Russia fires rockets, debris hits near train station. The Russian rocket, allegedly targeting the Ministry of Defense, was shot down by an air defense system, and its wreckage fell near Kyiv’s main train station: The Kyiv Independent
— ANI (@ANI) March 2, 2022
युक्रेन आणि रशिया आज चर्चा करणार
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने सांगितलं की, "गुरुवारी (3 मार्च) होणाऱ्या चर्चेसाठी युक्रेनचं एक शिष्टमंडळ बेलारुसला येत आहे." रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करणारे व्लादिमीर मेडिंस्की यांनी बुधवारी (2 मार्च) पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, "माझ्या माहितीनुसार युक्रेनचं शिष्टमंडळ कीवहून रवाना झालं आहे. आम्ही उद्या (गुरुवार, 3 मार्च) चर्चेची अपेक्षा करत आहोत. त्यांनी सांगितलं की, "दोन्ही देशांनी पोलंडच्या सीमेजवळील बेलारुसच्या क्षेत्रात चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे." तर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांच्या कार्यालयानेही शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु तिथे पोहोचण्याच्या वेळेची माहिती दिलेली नाही.
युक्रेनमध्ये सुमारे 500 रशियन सैनिकांचा मृत्यू : रशिया
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "युक्रेनमध्ये आमचे 498 सैनिक मारले गेले असून 1,597 जखमी आहेत." मेजर जनरल इगोर कोनाशेनकोव यांनी रशियाचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं. मागील गुरुवारी सुरु झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच रशियन सैनिकांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
मृत सैनिकांच्या कुटुंबियांना सर्व आवश्यक मदत मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धासाठी लोकांना बळजबरीने सैन्यात सामील करुन घेतलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मीडियामधील वृत्त खोटं आणि चुकीचं असल्याचा दावा त्यांनी केला. कोनाशेनकोव यांनी हे देखील सांगितलं की, "युक्रेनचे 2,870 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले असून सुमारे 3,700 जखमी झाले आहेत. तर 572 इतर सैनिकांना कैद करण्यात आलं आहे."