Boris Johnson Resigns: अखेर बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर
Boris Johnson Resigns: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.
Boris Johnson Resigns: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांनी हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला होता. नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
ब्रिटनमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याची लाट
बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जॉन ग्लेन, प्रीति पटेल, ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली होती.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजी नसल्याचे म्हटले जात होते. बोरिस जॉन्सन यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठका घेतल्या होत्या. ऋषी सोनक यांच्याऐवजी नदीम जहावी यांना अर्थ खात्याची धुरा सोपवण्यात आली होती. तर, स्टीव्ह बार्कले यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र, मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या अविश्वासामुळे जॉन्सन यांनी हुजूर पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची पंतप्रधानपदावरूनही गच्छंती अटळ होती. अखेर त्यांनी पंतप्रधानपदाचाही राजीनामा दिला.
ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं आर्थिक संकट उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. कोरोना काळात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या घरी नियमांचे उल्लंघन करून झालेल्या पार्टीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत होती.