वॉशिंग्टन डी सी : टायटन नावाची सबमर्सिबल (पाणबुडी) अटलांटिक समुद्रात बुडालेल्या महाकाय टायटॅनिक जहजाला पाहण्यासाठी गेली होती. एकूण पाच जणांनी जून 2023 मध्ये हे धाडस केलं होतं. मात्र या पाणबुडीचा समुद्रात खोल गेल्यानंतर दुर्दैवी प्राणघातक स्फोट झाला होता. याच टायटन सबमर्सिबलच्या सांगाड्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत टायटन ही पाणबुडी समुद्राच्या तळाशी विखुरलेली पाहायला मिळत आहे. 


पाणबुडीचा प्राणघातक स्फोट 


अटलांटिक समुद्रात बुडालेली टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी जून 2023 मध्ये टायटन नावाच्या पाणबुडीने अटलांटिक समुद्रात आपला प्रवास चालू केला होता. मात्र खोल पाण्यात गेल्यानंतर पाण्याच्या उच्च दाबामुळे या पाणबुडीचा प्राणघातक स्फोट झाला होता. या स्फोटात पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या पाचही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही घटना खोल समुद्रात घडल्यामुळे प्रवाशांचे मृतदेहही हाती लागले नव्हते.  


3777 मीटर खोल समुद्रात सांगाडा सापडला


ही घटना घडल्यानंतर पाच प्रवाशांचा शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली होती. मात्र टायटन या सबमर्सिबलचे काही भाग वगळता शोधकर्त्यांना काहीही सापडले नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच टायटन या समबर्सिबलचा साधारण 3777 मीटर खोल समुद्रात असलेला सांगाडा दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. 


टायटन पाणबुडीचे विखुरलेले अवशेष


या व्हिडीओत टायटन ही सबमर्सिबल विखुरलेल्या स्थितीत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ अमेरिकन कोस्ट गार्डने शेअर केला आहे. कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या परिसरात ही घटना घडली होती. या व्हिडीओमध्ये टायटन पाणबुडीचा तुटलेला मागचे भाग पाहायला मिळत आहे. या पाणबुडीचे तुकडे झालेले पाहायला मिळत आहेत. पाणबुडीच्या मागच्या भागाजवळ ते इतरत्र विखुरलेले दिसत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेत टायटनचा विलग झालेला मागचा भाग तसेच इतर अवशेष पाहून या पाणबुडीचा विनाशकारी स्फोट झाला होता, हे स्पष्ट होते, असा दावा अमेरिकेच्या मरीन बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशनने केला आहे. 


पाहा व्हिडीओ :






1912 साली बुडाले होते टायटॅनिक जहाज


टायटन या जहाजात ब्रिटिश संशोधक हॅमिश हार्डिंग, ब्रिटिश पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान, टायटन या पाणबुडीची मालकी असलेल्या ओशन गेट या अमेरिकन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॉकटन रश, फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट हे पाच जण प्रवास करत होते. 1912 साली महाकाय असे टायटॅनिक जहाज अटलांटिक समुद्रातून प्रवास करत होते. मात्र हीमनगला टक्कर झाल्यामुळे हे जहाज पाण्यात बुडाले होते. या दुर्घटनेत साधारण 1500 जणांचा मृत्यू झाला होता. टायटॅनिक या जहाजाचा सांगाडा सध्या अटलांटिक समुद्राच्या तळाशी आहे. टायटॅनिक जहाजाचे हेच अवशेष पाहण्यासाठी टायटन ही पाणबुडी प्रवास करत होती.


हेही वाचा :


Titanic submarine : बेपत्ता टायटन पाणबुडीतील 'त्या' 5 जणांचा मृत्यू; स्फोटानंतर सापडले अवशेष


Titanic Submarine : टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन पाच अब्जाधीशांचा मृत्यू, या स्फोटामागचं नेमकं कारण काय?