Titan Submarine Update : टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. नौदलाला बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला असल्याचं आढळून आलं आहे. पाणबुडीच्या स्फोटात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे.


बेपत्ता टायटन पाणबुडीतील 5 जणांचा मृत्यू


अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. यानंतर लगेचच अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशाच्या नौदलाकडून शोधकार्य सुरु होतं. युएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली 22 फुट टायटन पाणबुडीच्या शोधात असलेल्या शोध आणि बचाव पथकांना गुरुवारी सकाळी टायटॅनिकच्या अवशेषांच्या जवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले. टायटन पाणबुडीवरील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ओशनगेट या कंपनीने दिली आहे.


टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले


टायटॅनिकच्या जहाजाच्या अवशेषांपासून सुमारे 1,600 फूट अंतरावर समुद्राच्या तळावर बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांनुसार, प्रेशर चेंबरमध्ये स्फोट झाल्याचं सांगितलं जात असून या बाबत अधिकृत माहिती तपासानंतर समोर येईल. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, टायटन पाणबुडीचा स्फोट नेमका कधी झाला हे सांगणे सध्या कठीण आहे. यूएस कोस्ट गार्डचे रिअर अॅडमिरल जॉन मॅगर यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आहे. 


ओशनगेटचे CEO ही बेपत्ता पाणबुडीत


अपघातग्रस्त टायटन पाणबुडीमध्ये ओशनगेट एक्स्पिडिशन्सचे संस्थापक आणि CEO स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग, प्रसिद्ध फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट, पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद आणि त्याचा 19 वर्षांचा मुलगा सुलेमान हे पाच जण होते. याचा मृत्यू झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार, समोर येत आहे.


प्रेशर चेंबरमध्ये स्फोट झाल्याची शक्यता


ओशनगेट कंपनीने म्हटलं आहे की, ''प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबासाठी ही अत्यंत दुःखद वेळ आहे.'' टायटन ओशनगेट एक्स्पिडिशन्स (OceanGate Expeditions) सबमर्सिबल या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी नौदलाने टॉप सिक्रेट अकॉस्टिक डिटेक्शन सिस्टमचा वापर केल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिली आहे.


"सुलेमान या मोहिमेसाठी तयार नव्हता"


दरम्यान, पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद यांचा मुलगा या मोहिमेआधीच घाबरलेला होता, असा खुलासा त्याच्या मावशीने केला आहे. आझमेह दाऊदने NBC न्यूजला सांगितलं की, "सुलेमान पूर्णपणे घाबरला होता आणि त्याच्या टायटॅनिक प्रेमी वडिलांसाठी ही मोहिम महत्त्वाची असल्यामुळे तो मोहिमेवर जाण्यास तयार झाला होता, तो यासाठी फारसा तयार नव्हता."