Sri Lanka Petrol Diesel Crisis : भारताचा शेजारील देश असलेला श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात परदेशी चलनाची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी आता त्यांच्याकडे पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. श्रीलंकेत अधिकतर पेट्रोल पंपावर इंधन संपलं असल्याने मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आल्याचं चित्र आहे. जे पेट्रोल पंप सुरू आहेत, तिथे लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. परदेशी चलनाच्या अभावामुळे देशात मोठे आर्थिक संकट निर्माण झालं आहे, अशी माहिती स्वतः श्रीलंका सरकारने जाहीर केली आहे.
श्रीलंकेची सध्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की, त्याच्याकडे इंधनाच्या दोन खेपांसाठी देखील पुरेसे अमेरिकन डॉलरही नाहीत. श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री उदय गमनापिला यांनी सोमवारी सांगितले की, "आज इंधनाच्या दोन खेप आल्या आहेत, परंतु आम्ही त्याचे पैसे देऊ शकत नाही." गेल्या आठवड्यात सरकारी रिफायनरी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (CPC) ने सांगितले की, त्यांच्याकडे परदेशातून कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. सरकारने ठरवून दिलेल्या किमतींवर डिझेलच्या विक्रीमुळे 2021 मध्ये सीपीसीला 41.5 कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे.
उदय गमनापिला म्हणाले आहेत की, ''मी जानेवारी महिन्यात दोनदा आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच देशात इंधन कमतरतेची माहिती दिली होती. परदेशी चलनाच्या कमतरतेमुळे देशातील ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. इंधनासाठी श्रीलंका प्रामुख्याने आयातीवर निर्भर आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे देशात पेट्रोल पंपांसमोर मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.'' दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेने भारतीय इंधन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनकडून 40, 000 टन डिझेल आणि पेट्रोल खरेदी केलं होत.
महत्वाच्या बातम्या :
- Singapore PM Remarks On Indian MPs : सिंगापूरच्या पंतप्रधानांचे भारतीय खासदारांवर वादग्रस्त वक्तव्य, परराष्ट्र मंत्रालयाचा आक्षेप
- Hollywood Sign : हॉलीवुडचा प्रसिद्ध साईनबोर्ड झाला 'RAMSHOUSE', नेमकं कारण काय?
- Russia-Ukraine conflict : गरज नसल्यास भारतीय विद्यार्थ्यांनी परत यावे, भारतीय दूतावासाकडून परिपत्रक जारी
- Corona Test : कोरोना चाचणी नको रे बाबा! ‘या’ कारणामुळे रशियात बड्या नेत्यांना कोरोना चाचणीची धास्ती