Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी इतर देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. रशियाने हल्ला केल्यास युक्रेनच्या बाजूने उतरणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्याशिवाय रशियाविरोधात काही युरोपीयन देशही उतरण्याची शक्यता आहे. या घडामोडींचे पडसाद जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्ध पेटल्यास भारतावरही याचा परिणाम होणार आहे. 


भारताची भूमिका काय?


रशिया आणि युक्रेनच्या वादावर भारताने भूमिका घ्यावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे. युद्ध झाल्यास भारत अमेरिका-युक्रेनच्या बाजूने उतरेल अशी अपेक्षाही अमेरिकेने व्यक्त केली होती. तर, भारताने चर्चेद्वारे वाद सोडवण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या बाजूने थेटपणे उभं राहणं हे भारताला अडचणीचे ठरू शकते असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.  


युद्धाचा काय परिणाम होईल?


युद्धाच्या सावटामुळे जगातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. भारतीय शेअर बाजारातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री केली आहे. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. युद्ध झाल्यास भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


इंधन दर वाढणार


रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति बॅरल 100 डॉलर इतका उच्चांक दर ही गाठला आहे. सध्या प्रति बॅरल 93 डॉलर असा दर सुरू आहे. प्रत्यक्षात युद्ध पेटल्यास कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने देशात इंधन दरवाढ आणि पर्यायाने महागाईमध्ये वाढ होण्याची भीती आहे. 


भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम



भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतो. भारतीय लष्करात जवळपास 60 टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्याशिवाय रशियाकडून एस-400 ही क्षेपणास्त्रविरोधी एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. युद्ध पेटल्यास रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रशियाकडून भारताला होणारा शस्त्र पुरवठा खंडित होऊ शकतो. 


रशिया-चीनची जवळीक डोकेदुखी ठरणार


युद्ध झाल्यास रशिया चीनकडे मदत मागू शकतो. ही स्थिती भारतासाठी भविष्यात चिंताजनक होऊ शकते. रशिया-चीन मैत्रीमुळे भारत-चीन सीमा प्रश्नात नवा वाद होऊ शकतो. रशिया हा भारताचा जुना मित्र असून अनेक कठीण काळात रशियाने भारताला मदत केली आहे.