Russia-Ukraine conflict : रशिया आणि यूक्रेन यांच्यामध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. ही परिस्थिती पाहाता यूक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि लोकांसाठी भारतीय दूतावासने (Indian Embassy) लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला दिला आहे. भारतीय दूतावासने ट्वीट करत ही विनंती केली आहे. त्यामध्ये युक्रेनमधील भारतीयांना सल्ला देण्यात आला आहे.
जर युक्रेनमध्ये राहणे गरजेचं नसेल तर तात्पुरत्या कालावधीसाठी भारतामध्ये परतावे. त्याशिवाय येथे असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनीही भारतात परतावे. भारतात परतण्यासाठी कमर्शियल फ्लाइट्स आणि चार्टर फ्लाइट्सचा वापर करु शकतात. तसेच भारतीय विद्यार्थ्यांनी स्टूडेंट कॉन्ट्रॅक्टर्ससोबत संपर्कात राहावे, असेही युक्रेनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. युक्रेनमध्ये भारताचे जवळपास 18 हजार विद्यार्थी आहेत. भारतीय दूतावासाकडून एक परिपत्रक काढत गरज नसल्यास भारतीय विद्यार्थ्यांनी परत यावे असे आवाहन केले होते. सोबतच भारतीय नागरिकांना देखील गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. तिकडे, यूक्रेनमधील परिस्थिती बिघडत असल्याचं दिसताच भारताकडून देखील एअर इंडियाच्या तीन फ्लाईट्स भारताकडे 22, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी झेपावणार आहे. त्यामुळे यूक्रेन आणि रशियात संघर्ष होत युद्ध होणार का? याची टांगती तलवार जगावर असेल.
फ्रान्स राष्ट्रपतींनी व्लादीमीर पुतिनसोबत केली चर्चा -
रशिया आणि यूक्रेन संकटामध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युनुएल मॅक्रों (Emmanuel Macron) यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. मॅक्रों यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. यूक्रेनमुद्द्यावर या दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे.
यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी पुतिन यांना दिले चर्चेचं आमंत्रण -
दोन्ही देशातील वाढत्या तणावांमध्ये यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांनी शनिवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना चर्चेचं आमंत्रण दिले आहे. चर्चेतून मार्ग निघेल, असे म्हणत यूक्रेनचे राष्ट्रपती चर्चेसाठी तयार झाले आहेत. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना काय हवेय हे मला माहित नाही, पण मी चर्चेसाठी तयार आहे. पुतीन चर्चेला तयार असल्यास लवकरच चर्चा करुन तोडगा निघेल.
युक्रेन-रशियात पुन्हा एकदा तणाव -
मागील काही दिवसांआधी रशियानं आपलं सैन्य मागे घेतल्याचा दावा केला होता. तसे फोटो देखील रशियन दूरचित्रवाहिण्यांवर दाखवले होते. मात्र, हा सर्व बनाव असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर अमेरिकेने रशियाला यूक्रेनवर हल्ला न करण्याचा इशारा देखील देऊ केला. मात्र रशियानं नाटोमुळे आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचं म्हणत युद्ध अभ्यास सुरुच ठेवलाय. यूक्रेनच्या सीमेवर 40 टक्के रशियन सैन्य तैनात असल्याचा दावा करण्यात आला आहे. बेलारूसमध्ये देखील रशियाचे सैन्य तैनात आहेत. त्यामुळे युरोपीय देशांना युद्ध होणार का? याची चिंता सतावते आहे. फ्रान्स, ब्रिटनसारख्या देशांकडून युद्ध टाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पुतीन यांच्यासोबत बातचीत देखील करण्यात आली, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. यूक्रेनमधील रशियाच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या भागात स्फोट आणि गोळीबार सुरु आहेत. यात यूक्रेनचे दोन सैनिक ठार झालेत.