Sri lanka Crisis : श्रीलंकेत लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू आज उठवण्यात आला आहे. श्रीलंकेत सार्वजनिक वाहतूक सामान्य सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. आर्थिक संकटाच्या विरोधात सरकारविरोधी निदर्शने केल्यानंतर, पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने रविवारी रात्री सामूहिक राजीनामा दिला होता. राज्यमंत्र्यांच्या राजीनाम्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान सरकारच्या भवितव्याबाबत निर्णय घेतील.


नवीन मंत्रिमंडळाची स्थापना
याबाबत श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज विशेष वक्तव्य करू शकतात. दरम्यान राष्ट्रपती आज कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेत गंभीर आर्थिक संकट असताना नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोकांचा राग शांत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये सोमवारी नवीन मंत्रिमंडळाची शपथ घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रविवारी देशातील सर्व 26 मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. 


तेल आणि वीज संकटावर लवकरच उपाय शोधणार
शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने म्हणाले की, पंतप्रधान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेणार आहेत. शिक्षणमंत्री म्हणाले, 'देशातील परिस्थितीबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली असून तेल आणि वीज संकटावर लवकरच उपाय शोधले जातील. देशाची आर्थिक स्थिती हाताळता येत नसल्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. तेल, स्वयंपाकाच्या गॅससाठी लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. असे नागरिकांचे म्हणणे आहे.


श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात निदर्शने
देशातील निदर्शने पाहता कर्फ्यू लागू करण्यात आला होता, तरीही रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. आंदोलकांकडून राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा यांनी अनेक खासदारांसह कोलंबोच्या मध्यभागी असलेल्या इंडिपेंडन्स स्क्वेअरवर मोर्चा काढला आणि 'गोटा, घर जा' ​​अशा घोषणा दिल्या. दरम्यान, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांसह कॅंडी येथील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासह अनेक शहरांमध्ये निदर्शने पांगवली.