Bill Gates: मायक्रोसॉफ्ट हे आज कॉम्प्युटर जगातील खूप प्रसिद्ध नाव आहे. संगणक क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ही आघाडीची कंपनी आहे. Microsoft Corporation ची स्थापना बिल गेट्स आणि त्यांचे बालपणीचे मित्र पॉल ऍलन यांच्यासोबत मिळून 4 एप्रिल 1975 रोजी केली होती. या संगणक सॉफ्टवेअर कंपनीला 4 एप्रिल रोजी म्हणजेच सोमवारी 47 वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने बिल गेट्स यांनी एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कंपनीच्या यशाबद्दल सांगतांना लिहिलं आहे की, कंपनी लोकांना सक्षम करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.


बिल गेट्स यांनी त्यांचा जुना व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये खुर्चीवर उडी मारताना दिसत आहेत. कंपनीचे 47 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेट्स यांनी लिहिले की, "प्रत्येक डेस्कवर आणि प्रत्येक घरात संगणकाचं उद्दिष्ट कंपनीने पूर्ण केलं आहे. मला अभिमान आहे की, कंपनी प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी मदत करत आहे.'' 




बिल गेट्स यांनी 2000 साली कंपनीचे सीईओ पद सोडले


कोरोना महामारीच्या काळात घरबसल्या काम करण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत बदल झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर आणि आपल्या सेवांद्वारे अधिक वापरकर्त्यांना आकर्षित केले आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याचे सांगत गेट्स यांनी 2000 साली कंपनीचे सीईओ पद सोडले. त्यांनी 2008 मध्ये मायक्रोसॉफ्टमधील त्यांची पूर्णवेळ भूमिका सोडली, मात्र मार्च 2020 पर्यंत ते मायक्रोसॉफ्टच्या बोर्डाचे सदस्य होते.