North Korea : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता उत्तर कोरियाने दिलेल्या धमकीमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाविरोधात आगळीक केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. आम्ही अणुबॉम्ब डागण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा गर्भित इशारा किम यो जोंग यांनी दिला. 


किम यो जोंग या सत्ताधारी कोरिया वर्कर्स पार्टीच्या प्रमुख नेत्या आहेत. विद्यमान राष्ट्रपती किम जोंग उन यांच्या त्या राजकीय उत्तराधिकारी समजल्या जातात. किम यो जोंग यांनी म्हटले की, दक्षिण कोरियाने एका चर्चे दरम्यान देशाच्या लष्करी क्षमतेचा उल्लेख केला होता. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी वाईट झाले आहेत. त्यामुळे लष्करी तणावात वाढ झाली असल्याचे किम यो जोंग यांनी म्हटले. किम यो जोंग या उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांच्या राजकीय सल्लागारदेखील आहेत. अमेरिकेसोबतच्या चर्चेच्या वेळी किम यो जोंग यांच्याकडे पडद्यामागील सुत्रे होती. किम यो जोंग यांनी केलेल्या वक्तव्याकडे गंभीरपणे पाहिले जाते. 


दक्षिण कोरियाचे मंत्री सुह वूक म्हणाले की त्यांच्या देशाकडे विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रे आहेत जी उत्तर कोरियाच्या कोणत्याही तळावर अचूकपणे हल्ला करू शकतात. त्यांनी उत्तर कोरियाला आपला शत्रू असेही म्हटले होते. दक्षिण कोरियाच्या या वक्तव्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा उत्तर कोरियाने दिला. 


आण्विक हल्ल्यापासून मागे हटणार नाही - उत्तर कोरिया


दक्षिण कोरिया अथवा अमेरिकेने उत्तर कोरियाला आव्हान दिल्यास ते अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून मागे हटणार नाहीत, असा इशारा उत्तर कोरियाने यापूर्वी अनेकदा दिला आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी सुरू आहे. उत्तर कोरियाकडून सातत्याने होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण कोरिया, जपानने चिंता व्यक्त केली होती.