राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. तत्पूर्वी, संसदेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताविरोधात भकाऊ वक्तव्य केले आहे. "दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे, त्यामुळे युद्ध होऊ शकते. युद्धासाठी आम्हाला काही तास नाही तर फक्त काही मिनिटे लागतील." असे मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

  


गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात राजकीय संकट उभे ठाकले असतानाच शाह मेहमूद कुरेशी यांनी भारताविरुद्ध असे भडकाऊ वक्तव्य केले आहे. 9 मार्च रोजी चुकून पाकिस्तानात पडलेल्या क्षेपणास्त्रावरून कुरेशी यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. ते म्हणाले, भारताचे पाकिस्तानात पडलेले क्षेपणास्त्र आण्विक सक्षम होते. दोन्ही देशांकडेही अणुशक्ती आहे, त्यामुळे युद्ध होऊ शकतं. त्यासाठी आम्हाला काही तास नाही तर फक्त काही मिनिटे लागतील. दिल्लीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारवंतांचे नियंत्रण आहे. जगात पाकिस्तानचे कोणी ऐकत नाही. यूएनजीएमध्ये पाकिस्तानला वेगळ्या आणि भारताकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएनजीएमध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु, इम्रान खान सहभागी होऊ शकत नाहीत." 


"भारताकडे आम्ही चीनच्या नजरेने पाहतो, असे आम्हाला म्हटले जाते. आम्ही अमेरिकेचे चांगले मित्र आहोत. परंतु,  आम्ही अमेरिकेला जम्मू-काश्मीरच्या समस्येत हस्तक्षेप करण्यास सांगतो त्यावेळी ते आम्हाला द्विपक्षीयपणे हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला देतात. भारतासमोर पाकिस्तानची काही किंमत नाही. आम्हाला सर्वांशी चांगले संबंध हवे आहेत. आम्हाला कोणाशीही शत्रुत्व करायचे नाही," असे कुरेशी यांनी म्हटले आहे. 


इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करताना भारताचे कौतुक केले होते. मात्र, त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज भारताविरोधात भडकाऊ वक्तव्य केले आहे. 


दरम्यान, इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळल्याबाबत उपसभापतींचा बचाव करत करेशी यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांनी खासदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोप कुरेशी यांनी केला आहे. खासदारांचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न कायदेशीर आहे का? विरोधकांनी बाजार मांडला आहे. आम्ही व्हिडीओ आणि पुराव्यासह निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला, परंतु, पुरावे असूनही निर्णय होऊ शकला नाही, अशी खंत कुरेशी यांनी व्यक्त केली.    


शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, "वॉशिंग्टनमध्ये 7 मार्च रोजी बैठक आयोजित केली जाते आणि 8 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव आणला जातो. निवडणूक घेण्याबाबत काय अटी आहेत हे सांगण्यासाठी निवडणूक आयोगाला बोलावले जाते. त्यानंतर निवडणूक आयोग म्हणतो की, आम्ही सात महिने निवडणुका घेऊ शकत नाही.  निवडणूक आयोग तीन महिन्यांत निवडणुका घेऊ शकत नाही का? अविश्वास ठराव आला नसता तर 90 दिवसांत निवडणुका झाल्या असत्या की नाही? असा प्रश्न कुरेशी यांनी उपस्थित केला. 


महत्वाच्या बातम्या