Pakistan News : पाकिस्तानमध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीबाबत आज अंतिम फैसला होणार आहे. इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होईल. सकाळी 11 वाजेपासून पाकिस्तानच्या संसदेच्या कामाला सुरुवात होईल. त्यामध्ये इम्रान खान यांना पायउतार करण्यासाठी 342 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात विरोधकांना 172 मतांची अवश्यकता आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं उपसभापती कासिम सूरी यांनी सभागृहात अविश्वास प्रस्ताव फेटाळल्याचा निर्णय रद्द करून तो निर्णय घटनाबाह्य ठरवला. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा झटका बसला होता. आपल्या पदावरुन हटवण्यासाठी काही परकीय देश प्रयत्न करत असल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी केला होता. दरम्यान आजच्या अविश्वास ठारावर इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीचं भविष्य अवलंबून असले.
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशवासियांना संबोधित केलं. या भाषणात त्यांनी भारताचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की, मी भारतातील लोकांना इतरांपेक्षा अधिक जाणतो. मला वाईट वाटतंय की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या कारणामुळे संबंध बिघडले. भारताबाबत काही बोलण्यास कुणाची हिंमत नाही. कुणा परदेशी ताकदीची हिंमत नाहीय की, भारताच्या परराष्ट्रीय धोरणात हस्तक्षेप करेल. भारत एक स्वाभिमानी देश आहे, असं इम्रान म्हणाले.
इम्रान खान म्हणाले की, भारताचं परराष्ट्र धोरण स्वतंत्र असून, दबावाकडे दुर्लक्ष करून भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी शांततेचं आवाहन करताना म्हटलं की, रविवारी नमाजानंतर सर्वांनी बाहेर पडा आणि शांततेनं आंदोलन करा. या निदर्शनांदरम्यान तोडफोड करायची नाही. तुम्ही दाखवून द्यायचं आहे की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बाहेर पडला आहात. हे जे बाहेरील लोक कट रचून नाटकबाजी करतायेत, त्यांचा तुम्ही विरोध केला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. यामुळे कळेल की पाकिस्तान हे एक जिवंत राष्ट्र आहे. इतिहास कधीच माफ करू शकत नाही. कोण काय भूमिका घेतोय, याची दखल इतिहास घेतो, असं ते म्हणाले.
भारत इतका आवडतो तर तिकडेच जा- मरियम नवाज शरीफ
इमरान खान यांनी भारताचं कौतुक केल्यानंतर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. मरियम नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, खुर्ची जात असल्याचं दिसत असल्यानं हा व्यक्ती वेडा झालाय. भारत तुम्हाला जर एवढाच आवडतो तर पाकिस्तान सोडून भारतात जाऊन राहावं.