अंतराळवीरांच्या रक्तापासून मंगळावर बनणार घरं; रक्त, घाम आणि अश्रूपासून विशिष्ट पद्धतीच्या कॉंक्रिटची निर्मिती सुरु
मंगळावर (Mars) आता कॉलनी निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या विटा या अंतराळवीरांच्या रक्त, घाम आणि अश्रूपासून तयार करण्यात येत आहेत.
Mars : 'अनंत आमुची ध्येयासक्ती' म्हणत मानवाने आता मंगळावर वस्ती निर्माण करायची योजना बनवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळावर कॉलनी तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या काँक्रिटच्या विटांची निर्मिती करण्यात येत आहे. मॅन्चेस्टर विद्यापीठातील (University of Manchester) वैज्ञानिकांनी आता धुळीच्या, मातीच्या सोबत अंतराळवीरांच्या रक्त, घाम आणि अश्रूपासून एक विशिष्ट पद्धतीच्या काँक्रिटची निर्मिती केली आहे. या काँक्रिटच्या विटांपासून मंगळावर एक कॉलनी निर्माण करण्याची योजना आखली जात आहे.
मंगळावर एक विट घेऊन जायचं म्हटलं तर जवळपास 1500 कोटी रुपयांचा खर्च आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे पृथ्वीवरुन साहित्य घेऊन जाणे आणि मंगळावर कॉलनी तयार करणे हे किती महागात पडू शकतं हा विचार न केलेलाच बरा. मग यावर वैज्ञानिकांनी उपाय काढला आहे. तो म्हणजे विटा तयार करण्यासाठी मंगळावरची धूळ आणि तिकडे गेलेल्या अंतराळवीरांचे रक्त, घाम आणि अश्रूंचा वापर करायचा आणि काँक्रिट तयार करायचं.
एका अभ्यासात असं सिद्ध झालंय की मानवाच्या रक्तातील प्रोटिन्स ज्याला ह्यूमन सिरम अल्ब्युमिन (Human Serum Albumin) म्हटलं जातं, ते युरियासोबत (मानवाच्या रक्त, लघवी, घाम आणि अश्रूमध्ये सापडणाऱ्या) आणि मंगळावर सापडणाऱ्या माती किंवा धुळीसोबत मिसळलं असता काँक्रिटहून अधिक मजबूत मटेरियल तयार होतं. त्यामुळे मंगळासारख्या ग्रहावर, ज्या ठिकाणी पाणी सापडलं नाही, त्या ठिकाणी मानव आपली कॉलनी उभा करु शकतो.
संशोधकांनी दावा केलाय की, अशा प्रकारे मंगळावर सहा अंतराळवीर सलग दोन वर्षे काम करुन 500 किलोचे काँक्रिट तयार करु शकतात. त्यामुळे या पुढच्या काळात मंगळावर कॉलनी उभा करता येऊ शकते आणि त्याचा वापर अंतराळवीरांसाठी केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
- SpaceX Mission : इलॉन मस्क यांचे 'इन्स्पिरेशन 4' यशस्वी; सामान्य लोकांची पहिली अंतराळ सफर पूर्ण
- Blood Test Detecting Cancer : एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून होणार 50 प्रकारच्या कॅन्सरचं निदान
- Viral News : महिलेच्या अंतर्वस्त्रामध्ये लपून पालीने केला तब्बल चार हजार मैलांचा प्रवास, इंग्लंडमधील विचित्र घटना