Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरुच आहे. या युद्धाला 70 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. तरीही दोन्ही देशांमधील संघर्ष कायम आहे. युक्रेननं रशियाला चोख प्रत्युत्तर देत युद्ध सुरुच ठेवलं आहे. तर दुसरीकडे आज रशिया विजय दिवस साजरा करत आहे. दुसऱ्या विश्व युद्धात आजच्याच दिवशी रशियाने जर्मनीवर विजय मिळवला होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रशिया हा दिवस उत्साहात साजरा करत आहे.
या खास दिनानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशांनी शुभेच्छा देत खास संदेश पाठवला आहे. या 15 देशांमध्ये युक्रेनचाही समावेश आहे. या खास संदेशामध्ये पुतिन यांनी रशियन सैन्याचं कौतुक करत म्हटलं आहे की, 'पूर्वजांप्रमाणेच रशियन सैनिक मातृभूमीला नाझीपासून मुक्त करण्यासाठी लढत आहेत. आज आमचे कर्तव्य नाझीवाद थांबवण्याचं आहे. या नाझीवादामुळे वेगवेगळ्या देशांमधील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.'
युक्रेन व्यतिरिक्त 'या' देशांना पाठवला संदेश
रशियामध्ये विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही या विशेष सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. माजी सैनिकांकडून युद्ध स्मारकांवर पुष्पांजली अर्पण केली जाते. रशियाने अझरबैजान, आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान, किर्गिस्तान, मोल्दोव्हा, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, अबखाझिया, दक्षिण ओसेशिया, डीपीआर, एलपीआर आणि जॉर्जिया या देशांना संदेश पाठवले आहेत. या देशांमध्ये युक्रेनचाही समावेश आहे.
युक्रेनचा रशियाला झटका
युक्रेनने रशियाची युद्धनौका मॉस्कवा नष्ट केली. हा रशियाला मोठा धक्का मानला जात आहे. मॉस्कवा युद्धनौकेवर मिसाईलसह इतर यंत्रसामग्री होती. या घटनेच्या एका दिवसापूर्वीच एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले होते की, अमेरिकेने युक्रेनला जहाजाच्या स्थानाची माहिती दिली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यात व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने त्यांची भूमिका मर्यादित असल्याचं सांगितलं. व्हाईट हाऊसनं म्हटलं की, युक्रेनियन सैन्य स्वतःचे निर्णय घेईल. आतापर्यंच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेला युक्रेनला पाठिंबा देताना अमेरिका आणि रशिया यांच्यात थेट संघर्ष टाळायचा आहे, असे दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या