Jill Biden Visits Ukraine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन या रविवारी अचानक पश्चिम युक्रेनमध्ये पोहोचल्या. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्की यांची भेट घेतली. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला भेट दिलेल्या अमेरिकन सेलिब्रिटींपैकी जिल एक आहेत. 'मला मदर्स डेला इथे यायचे होते. अमेरिकेचे लोक युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी उभे आहेत हे युक्रेनच्या लोकांना दाखवून द्यायचे होते, असे जिल यांनी ओलेना यांना या भेटीदरम्यान सांगितले.  


युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या स्लोव्हाकियामधील एका गावातील शाळेत जिल बायडन आणि  ओलेना झेलेन्स्की यांची रविवारी भेट झाली. ओलेना यांनी या भेटीबद्दल जिल यांचे आभार मानले आणि सांगितले की, "युद्धादरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला येथे येण्याचे महत्त्व आम्ही समजू शकतो." दररोज लष्करी हल्ले होत असताना तुम्ही येथे आला हे तुमचे धाडसच आहे.  


तत्पूर्वी, जिल बायडन या शनिवारी रोमानिया आणि स्लोव्हाकियाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर होत्या. स्लोव्हाकियाचीही युक्रेनशी सीमा आहे. जिल बायडन यांनी रशियन हल्ल्यामुळे देश सोडून गेलेल्या युक्रेनियन निर्वासितांना मानवतावादी मदत केल्याबद्दल रोमानियन सरकार आणि मदत देणाऱ्या संस्थांचे कौतुक केले आहे.


बुखारेस्टमधील यूएस दूतावासात मोठ्या प्रमाणात मदत कार्यांबद्दल सुमारे एक तास बायडन यांनी भाषण केले. या भाषणात बायडन यांनी रोमानियन सरकारचे कौतुक केले. त्या म्हणाल्या,  "हे आश्चर्यकारक आहे. तुम्ही सर्व एकत्र काम करत आहात ही रोमानियाची एकता आहे. 


दरम्यान, शुक्रवारी  जो बायडन यांनी युक्रेनला "अतिरिक्त तोफखाना, रडार आणि इतर उपकरणांची मदत जाहीर केली. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 25,000 155 मिमी तोफांचे राउंड, काउंटर-आर्टिलरी रडार, जॅमिंग उपकरणे, फील्डवरील उपकरणे आणि शस्त्रांचे सुटे भाग यांचा  युक्रेनला केलेल्या मदतीत समावेश आहे. याबरोबरच युक्रेनला दीर्घकालीन मदत देण्याचा आपला मानस असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.