Russia Ukraine War : युक्रेनला 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्याची मागणी राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली. मात्र, नाटोने या मागणीला नकार दिला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. झेलेन्सकी यांनी म्हटले की, 'नो-फ्लाय झोन' घोषित न करणे म्हणजे नाटोकडून रशियाला हल्ला करण्यासाठी मोकळीक देण्यासारखे आहे. युक्रेनच्या शहरांवर, गावांवर बॉम्बवर्षाव करण्यासाठी ही परवानगी देण्यासारखे असल्याचे युक्रेनने म्हटले. जाणून घेऊयात 'नो फ्लाय झोन' म्हणजे काय...


'नो फ्लाय झोन' म्हणजे काय?


'नो फ्लाय झोन' जाहीर केलेल्या भागात कोणत्याही अनधिकृत विमानाला उड्डाण करण्यास परवानगी नसते. सहसा 'नो फ्लाय झोन' हा लष्कराकडून ठरवला जातो. युद्ध अथवा एखाद्या सुरक्षितेच्या दृष्टीने असणाऱ्या आपात्कालीन स्थितीत 'नो फ्लाय झोन' जाहीर केला जातो. 


'नो फ्लाय झोन' जाहीर करण्याची सुरुवात कधी?


> पाश्चिमात्य देशांनी 1991 पासून आखाती देशातील युद्धानंतर इराकमधील अनेक भागांमध्ये 'नो-फ्लाय झोन' तयार केला होता. 


> सन 1993-95 च्या दरम्यान, बोस्निया आणि हर्जगोविनामध्ये नागरी युद्धाच्या दरम्यानही 'नो-फ्लाय झोन' तयार करण्यात आले होते. 


> सन 2011 मधील लीबियातील गृह युद्धादरम्यान 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला होता. 


युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'साठी नाटोचा नकार का?


युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा केल्याने रशियासोबत उघडपणे लष्करी संघर्ष होऊ शकतो अशी भीती 'नाटो'ला आहे. युक्रेनपर्यंत मर्यादित असणारा संघर्ष हा युरोपमध्ये फैलावू शकतो. 'नाटो' आपल्या मोहिमेला बळ देण्यासाठी रिफ्युलिंग टँकर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स-सर्व्हिलान्स एअरक्राफ्ट देखील तैनात करावे लागतील. त्यांच्या सुरक्षितेसाठी 'नाटो'ला रशिया आणि बेलारुसमध्ये जमिनीहून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना नष्ट करावे लागतील. त्यामुळे आणखी तणाव वाढू शकतो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha