Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनने शस्त्रसंधी लागू करण्याचे आवाहन भारताने केले आहे. ही शस्त्रसंधी लागू झाल्यास तीन हजार भारतीयांना या युद्धग्रस्त भागातून सुखरूप मायदेशी आणता येईल. खारकीव्ह आणि सुमी या पूर्व युक्रेनच्या भागात मोठ्या प्रमाणावर हल्ले-प्रतिहल्ले, गोळीबार सुरू असल्याने भारतीयांची सुटका करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 


मागील महिन्यात रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 20 हजार भारतीयांनी युक्रेन सोडले आहे. जवळपास 48 विमानांमधून 10,400 भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आले आहे. दूतावासाच्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये दूतावासाकडे नोंदणी केलेले 20 हजार भारतीय होते. 


पूर्व युक्रेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भागातून भारतीयांना सुखरूप आणणे ही आमची प्राथमिकता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. युद्धविराम झाल्यास भारतीयांना तातडीने मायदेशी आणता येईल. बॉम्ब हल्ले, गोळीबार सुरू असताना भारतीयांची सुटका करणे हे आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. युद्धक्षेत्रात काहीही घडू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरक्षित असलेले ठिकाण सोडू नये असे वाटतं, असेही त्यांनी म्हटले. 


रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रशियन अधिकाऱ्यांनी खारकीव्ह आणि सुमी या भागातून भारतीयांना रशियातील बेल्गोर्ड या शहरात नेण्यासाठी 130 बसची व्यवस्था करण्याची तयारी दशर्वली आहे. याबाबत बागची म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आसरा घेतलेल्या ठिकाणापासून 50 ते 60 किमी अंतरावर ही बसेस असणार आहेत. तिथंपर्यंत जाण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केल्यास भारतीयांची सुखरूप सुटका करता येईल, असेही त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha