पंजाब : पाकिस्तानच्या खानेवालमध्ये इम्रान सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या PPP नेत्या असिफा भुट्टो यांच्यासोबत अपघात घडला. कार्यक्रमादरम्यान त्यांना ड्रोन धडकलं, ज्यात त्या जखमी झाल्या. या अपघातामुळे त्यांच्या डोळ्याच्या वर अनेक टाके पडले असून त्या रिकव्हर होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार (04 मार्च) पाकिस्तानच्या खानेवाल परिसरात PPP नेते निदर्शने करत होते. विद्यमान इम्रान सरकारविरोधात आंदोलन सुरु होतं. त्यावेळी या कार्यक्रमांचं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी मीडियाही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. त्याचवेळी मीडिया चॅनलचंच एक ड्रोन अचानक PPP नेत्या असिफा भुट्टो यांना धडकलं आणि त्या जखमी झाल्या. घटनेनंतर तिथे काही वेळ अफरातफरीचं वातावरण झालं होतं. त्यानंतर सुरक्षा अधिक वाढ करण्यात आली.
घात की घातपात, तपास सुरु
या घटनेबाबत बिलावल भुट्टो म्हणाले की, "हा अपघात आहे की घातपात हे अजून स्पष्ट नाही. बिलावल यांच्या सुरक्षारक्षकांनी संबंधित ड्रोन ऑपरेटरला पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे."
सरकराने काय म्हटलं?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारच्या प्रवक्त्ते हंसन खावन यांनी सांगितलं की, घटनेनंतर तातडीने तिथे डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी असिफा यांच्यावर उपचार केली. सध्या असिफा यांच्या डोळ्याच्या वर छोटी जखम झाली आहे, तसंच हातालाही दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागेल असं सुरुवातीला म्हटलं जात होतं. परंतु असिफा यांनी बॅण्डेज लावून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर बॅण्डेज लावलेला त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.
पाकिस्तान सरकारचे अनेक मंत्री आणि इतर नेते सोशल मीडियाद्वारे असिफा यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. असिफा लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी आशा व्यक्त करत आहेत.
27 फेब्रुवारी रोजी हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. 8 मार्च रोजी इस्लामाबादमध्ये पोहोचलण्याची तयारी करण्यात आली आहे. एकूण 34 जिल्ह्यांची यात्रा केल्यानंतर PPP चे आंदोलक तिथे पोहोचणार आहेत.