India-Ukraine Relations: युक्रेनच्या पंतप्रधानांनी भारताकडे मागितला मदतीचा हात, अर्थव्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
India-Ukraine Relations: रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी 2022 पासून युद्ध सुरु आहे. युक्रेनला आता युद्धामुळे मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे, त्यावर मात करण्यासाठी त्यांनी भारताला मदतीची विनंती केली आहे.
मुंबई : रशिया - युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) अजूनही युद्ध सुरु आहे. युद्धामुळे युक्रेनची आर्थिक स्थितीही कमकुवत झाली आहे. युद्धग्रस्त देश युक्रेनने आता आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताकडे मदत मागितली. युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मिहल यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना त्यांच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांना 'जागतिक नेता' असे संबोधले.
युक्रेनचे पंतप्रधान डेनिस यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, विद्यार्थ्यांना येथे परत पाठवून आणि पूर्वीप्रमाणे व्यापार पुनर्संचयित करण्याच्या दिशेने पावले उचलून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान मोदींना आवाहन
डेनिस श्मिहल यांनी भारताचे वर्णन युक्रेनचा सर्वात मोठा आर्थिक भागीदार असल्याचे केले आहे. त्यांनी भारताने युक्रेनला केलेल्या मदतीबद्दल भारताचे कौतुक देखील केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना भारत आणि युक्रेनमधील व्यापाराला पूर्वीप्रमाणे प्रोत्साहन देण्याची विनंती केली आहे जेणेकरून तेथील अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेऊ शकेल.
युद्धामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेमध्ये 30 टक्क्यांनी घसरण
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झाला. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था विस्कळीत झालीये. या युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था सुमारे 30 टक्के घसरली. युक्रेनची गेल्या 30 वर्षांतील ही सर्वात मोठी आर्थिक घसरण आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी 'ऑपरेशन गंगा'
युक्रेन युद्धानंतर भारताने 'ऑपरेशन गंगा'द्वारे तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांसह 18,000 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते. या युद्धाला फेब्रुवारीमध्ये दोन वर्षे पूर्ण होतील. युद्धामुळे मोठ्या संख्येने लोक मरण पावले आणि देशाला मोठ्या विध्वंसाचा सामना करावा लागला. यामुळे प्रभावित झालेल्या लाखो युक्रेनियन लोकांना विस्थापित करण्यासाठी मोठा खर्च करण्यात आला.
पंतप्रधान मोदींचे केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना युक्रेनचे पंतप्रधान म्हणाले की, 'जागतिक नेता' असण्यासोबतच ते जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत. ते म्हणाले की युक्रेनच्या युद्धग्रस्त देशाच्या मोठ्या भागात आता शांतता आहे, म्हणून मी भारताला पूर्वीप्रमाणे आर्थिक बळकटीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो.