Ukraine Electricity Supply Effected : युक्रेन ( Ukraine ) आणि रशिया ( Russia ) या देशांमधील संघर्ष अद्यापही सुरुच आहे. या युद्धाला ( Russia Ukraine War ) आता नऊ महिने पूर्ण होतील. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करत या युद्धाला सुरुवात केली होती. तेव्हापासून रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरुच आहेत. युक्रेनमधील शहरांसह देशाला ऊर्जा पुरवणाऱ्या प्लांटवर सुद्धा रशियाकडून सातत्याने हल्ले सुरु आहेत. रशियाने युक्रेनमधील ऊर्जा प्लांटला निशाणा बनवल्याने युक्रेनमध्ये ऊर्जा संकट गडद झालं आहे. दशलक्ष लोकांना विजेशिवाय अंधारात जगावं लागत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी गुरुवारी सांगितलं की, अनेक शहरांमध्ये लोकांना विजेअभावी अंधारात राहावं लागत आहे.


युक्रेनमधील ऊर्जा संकट गडद


रशियाकडून युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले सुरुच आहेत. रशियाने युक्रेनमधील न्यूक्लिअर प्लांटवर ( Russia Destroyed Ukraine's Power Grid ) हल्ले केले. यामुळे युक्रेनमधील ऊर्जा पुरवठा बाधित झाला आहे. परिणामी अनेक लोक सध्या विजेशिवाय अंधारात आहेत. झेलेन्स्की यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या युक्रेनमध्ये 10 दशलक्ष लोक वीज नसल्याने अंधारात आयुष्य जगत आहेत. दरम्यान झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या नागरिकांना ऊर्जा प्रवाह पुन्हा सुरु करण्यात येईल असं सांगितलं आहे.


नव्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सात जण ठार


बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रशियाने युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे अनेक ऊर्जा प्लांट आणि इतर इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. युक्रेन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील झापोरिझिया शहराजवळील विल्निस्क येथील अपार्टमेंट ब्लॉकमध्ये रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये सात जण ठार झाले आहेत.


गॅस निर्मिती प्रकल्प आणि क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला


युक्रेनियन अधिकार्‍यांनी सांगितलं आहे की, पूर्वेकडील गॅस उत्पादन प्रकल्प आणि डनिप्रोमधील क्षेपणास्त्र कारखाना हे रशियाच्या निशाण्यावर होते. वीजनिर्मिती प्रकल्पावर हल्ला झाल्यामुळे वीज पुरवठा प्रभावित होऊन कमी झाला आहे. परिणामी वीज कपातीमुळे युक्रेनची राजधानी कीव्ह, पश्चिमेकडील विनितसिया, नैऋत्येकडील ओडेसा बंदर शहर आणि ईशान्येकडील सुमी येथील लोकांना फटका बसला असून त्यांना अंधारात राहावं लागत आहेत. 


'रशियाने युक्रेनला नुकसानभरपाई द्यावी', UNGA मध्ये प्रस्ताव


युद्ध सुरु झाल्यापासू रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. यामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनला नुकसानभरपाई द्यावी असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेत मंजूर करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत रशियावर ( Russia ) दबाव वाढवणारा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर मतदान पार पडलं. 94 देशांनी या प्रस्तावाच्या बाजून मतदान केलं तर 14 देशांनी प्रस्तावाविरोधात मतदान केलं. या मतदानात भारताने तटस्थ भूमिका कायम ठेवत मतदान टाळलं. भारतासोबत 73 देशांनी मतदान केलं नाही.