United Nation General Assembly : संयुक्त राष्ट्र महासभेत ( UNGA ) रशिया आणि युक्रेन संघर्षावर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र महासभेत रशियावर ( Russia ) दबाव वाढवणारा आणखी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. युक्रेनमध्ये ( Ukraine ) झालेल्या नुकसानीसाठी रशियाने नुकसानभरपाई द्यावी असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेत सोमवारी सादर करण्यात आला. या प्रस्तावावर मतदान पार पडलं. 94 देशांनी या प्रस्तावाच्या बाजून मतदान केलं तर 14 देशांनी प्रस्तावाविरोधात मतदान केलं. या मतदानात भारताने तटस्थ भूमिका कायम ठेवत मतदान टाळलं. भारतासोबत 73 देशांनी मतदान केलं नाही.
भारताची भूमिका तटस्थ
रशिया आणि युक्रेनच्या मुद्द्यावर भारताने सुरुवातीपासूनच आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवली आहे. भारताने म्हटले आहे की, आम्ही युद्धाच्या समर्थनात नाहीत. मात्र, भारताने कधीही उघडपणे रशियाचा निषेध केला नाही. भारत आणि रशियाचे संबंध खूप चांगले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आपल्या परराष्ट्र धोरणानुसार पुढे जात आहे. भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापारामुळे आणि संबंध अनेक देशांच्या डोळ्यात खूपतात. यावर भारताने अनेकदा आपलं धोरण स्पष्ट केलं आहे.
युरोपीय संघांची भूमिका काय?
संयुक्त राष्ट्र महासभेत युरोपीय संघाने आपली भूमिका मांडत म्हटलं आहे की, युद्धातील आक्रमकतेसाठी आणि संघर्षासाठी रशिया जबाबदार आहे. त्यामुळे रशियाने युक्रेनला नुकसानभरपाई द्यायला हवी. संयुक्त राष्ट्र महासभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला 94 देशांनी सहमती दर्शवली.
24 फेब्रुवारी 2022 पासून सुरु आहे युद्ध
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला आता नऊ महिने पूर्ण झाले आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युद्धाला सुरुवात केली. दोन्ही देशांमधील युद्ध अद्याप कायम आहे. दोन्ही देशांनी युद्धांमध्ये हजारो सैनिक गमावले आहेत. या संघर्षामध्ये युक्रेनला सर्वाधिक नुकसान झालं आहे. याचा इतर देशांवरही मोठा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे.
तोपर्यंत युक्रेनहून माघारी परतणे नाही : पुतिन
रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्ध सुरुच आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष नऊ महिन्यांनंतरही सुरु आहे. एकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष या दोन्ही देशांतील संघर्ष संपण्याची वाट पाहत आहे. या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी केलेलं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. पुतिन यांच्या या वक्तव्यावर युद्धाची पुढील परिस्थिती अवलंबून आहे. पुतिन यांनी म्हटलं आहे की, 'जोपर्यंत निश्चित लक्ष्य पूर्ण होतं नाही तोपर्यंत रशियन सैन्याची युक्रेनमधील कारवाई सुरुच राहील.'