Russia Ukarine War : युक्रेनने ( Ukraine ) क्रीमियावर ( Crimea ) ड्रोन हल्ले केल्याचा गंभीर आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियाने युक्रेनवर मोठा आरोप करत म्हटलं आहे की, युक्रेनने क्रीमियातील सर्वात मोठ्या शहरावर तसेच जहाजे आणि बंदरावर ड्रोन हल्ले केले आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी याबाबत निवेदन जारी करत माहिती दिली आहे. रशियाने आंतराराष्ट्रीय पातळीवर याचा निषेध करत या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटलं आहे. तर युक्रेनने रशियाचे हे आरोप फेटाळत रशिया कटकारस्थान करत असल्याचं म्हटलं आहे.


रशियाने युक्रेनवर आरोप करत म्हटलं आहे की, युक्रेनने युरोपीय देश ब्रिटनच्या मदतीने क्रीमिया प्रदेशावर ड्रोन हल्ला केला आहे. क्रीमिया हा युरोपमधील प्रदेश असून त्यावर युक्रेनची सत्ता होती, मात्र सध्या क्रीमिया रशियाचा भाग आहे.


युक्रेनचा क्रीमियातील बंदरांवर हल्ला, रशियाचा आरोप


रशियाने आरोप केला आहे की, युक्रेनियन सैन्याने शनिवारी पहाटे रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या क्रीमियामधील सर्वात मोठं शहर सेवास्तोपोलमधील ब्लॅक सी फ्लीटच्या जहाजांवर ड्रोन हल्ला केला. युक्रेनियन सैन्याने सेव्हस्तोपोल तळाच्या बाहेरील आणि आतील रस्त्यांवर ब्लॅक सी फ्लीट जहाजे आणि नागरी जहाजांवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात नऊ हवाई वाहने आणि सात स्वायत्त सागरी ड्रोनवर हल्ला झाल्याचा आरोप रशियाने केला आहे.


ब्रिटनच्या मदतीने युक्रेनचा दहशतवादी हल्ला


रशियन फेडरेशनचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय समुदायाने काळ्या आणि बाल्टिक समुद्रात रशियाविरुद्धच्या दहशतवादी रशियावर होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दहशतवादी हल्ल्यांना ब्रिटनची मदत मिळत आहे. काळ्या समुद्रात अनेक व्यापारी आणि नागरी जहाजांवर हल्ले करण्यात आले आहेत. युक्रेनियन बंदरांवरून कृषी उत्पादने निर्यात करण्याच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून 'ग्रेन कॉरिडॉर' अंतर्गत ही जहाजं कार्यरत होती. मात्र युक्रेनने हल्ले केल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 


'रशियाने खोटेपणा आणि कारस्थान थांबवावं'


हे गंभीर फेटाळत ग्रीन कॉरिडॉर धोक्यात असण्यासाठी युक्रेनने रशियाला कारणीभूत ठरवलं आहे. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह नष्ट करण्याच्या रशियाच्या योजनांबाबत आम्ही इशारा दिला आहे. आता मॉस्को धान्य कॉरिडॉर बंद करण्यासाठी रशियाचा खोटारडेपणा सुरु असल्याचा आरोप युक्रेनने रशियावर केला आहे. रशियाने आता तरी त्याचा खोटारडेपणा आणि कटकारस्थान थांबवावं, असा इशारा युक्रेनने दिला आहे.