Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धजन्य स्थिती असताना आता अमेरिकेने रशियाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंधाची घोषणा केली आहे. यामुळे रशियाची मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. अमेरिका युक्रेनला लष्करी मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया-युक्रेन संकटाच्या मुद्यावर देशाला उद्देशून भाषण केले. बायडन यांनी म्हटले की, डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या प्रांतांची देश म्हणून घोषणा करणे, डोनबासमध्ये शांती सैन्य पाठवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात अमेरिका आर्थिक निर्बंध लागू करत आहे. या आर्थिक निर्बंधामुळे रशिया आता पाश्चिमात्य देशांसोबत व्यापार करू शकत नाही असेही बायडन यांनी म्हटले.
युक्रेनला लष्करी मदत
अमेरिका युक्रेन आणि रशियामधील घडामोडींवर लक्ष ठेवून असून परिस्थितीचे आकलन करत आहे. अमेरिकेकडून युद्ध टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय संरक्षणात्मक पावले उचलण्यात येत आहेत. अमेरिका युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करणे सुरूच ठेवणार आहे. या मुद्यावर नाटोसोबत एकत्र मिळून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही बायडन यांनी सांगितले.
जर्मनीदेखील हिसका दाखवणार?
बायडन यांनी सांगितले की, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्यासोबत चर्चा करून नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइनवर स्थगिती देण्याची तयारी सुरू आहे. नॉर्ड स्ट्रीम 2 मधून रशियाकडून जर्मनीला गॅस पुरवठा करण्यात येतो. बायडन यांनी रशियाला इशारा देताना म्हटले की, अमेरिका रशियावर 2014 मध्ये लागू केलेल्या कठोर निर्बंधापेक्षाही अधिक कठोर निर्बंध लागू करणार आहे. युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात करून रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले असल्याचेही बायडन यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Crisis: आम्ही कोणाला घाबरत नाही; रशियाच्या धमकीवर युक्रेनचे राष्ट्रपती गरजले
- Russia Ukraine Conflict and India : रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय होईल परिणाम?
- Explainer : रशियानं युक्रेनमधील प्रांताबाबत घेतलेल्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha