Russia Ukraine Conflict :  रशियाने युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर युद्धाचे सावट आणखीच गडद झाले आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या भाषणानंतर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देशाला संबोधित केले. राष्ट्रपती व्लादिमीर जेलेंस्की यांनी आम्ही कोणालाही घाबरत नसल्याचे म्हटले. 


रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश असल्याचे जाहीर केले. इतकंच नव्हे तर या प्रांतात रशियन सैन्य पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या प्रांतात रशिया समर्थक बंडखोरांचे वर्चस्व आहे. पुतीन यांनी केलेल्या भाषणावर जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेंस्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले  की, आम्ही आमच्या भूभागावर आहोत. आम्ही कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही. या भाषणात त्यांनी पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असल्याचे संकेत दिले.


युक्रेनबाबत अमेरिका, नाटो देश नाराज


रशियाच्या भूमिकेवर अमेरिकेसह युरोपीयन युनियन, नाटो, ब्रिटन आदी देशांनी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जेन साकी यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) या प्रांतात गुंतवणूक, व्यापार आणि आर्थिक मदतीबाबत निर्बंध लागू केले आहेत. 


रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटले...


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) तातडीची बैठक बोलावली.  या बैठकीत रशियाने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे असलं तरी रशियानं खुल्या चर्चेस मान्यता दिली. अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा निषेध केला. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी घेतलेला निर्णय हा युक्रेनचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले. 


भारताची भूमिका काय?


या बैठकीत भारतानेही आपली भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले की, युक्रेनच्या सीमेवर वाढणारा तणाव हा गंभीर विषय आहे. सध्या घडत असलेल्या घटनांमुळे या भागातील शांतता आणि सुरक्षितेला कमकुवत करू शकतात. वादावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे भारताने म्हटले. युक्रेनमध्ये 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, डॉक्टर युक्रेनच्या विविध भागात वास्तव्यास आहेत. या भारतीयांची सुरक्षिता ही आमची प्राथमिकता असल्याचेही टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha