France Flight :  303 भारतीयांना घेऊन दुबई ते निकाराग्वा या विमानाला फ्रान्सहून मुंबईला जाण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, परवानगी मिळून 24 तासानंतरही हे विमान उड्डाण करू शकले नाही. विमानातील काही प्रवाशांनी भारतात परतण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी काहींनी फ्रेंच सरकारकडे लेखी विनंती करत आश्रय मागितला आहे. या प्रवाशांना आश्रय देण्याबाबत फ्रान्स सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबईहून निकाराग्वाला जाणारे चार्टर फ्लाइट 303 प्रवाशांना घेऊन 21 डिसेंबर रोजी 'मानवी तस्करी' च्या संशयावरून पॅरिसच्या 150 किमी पूर्वेला वॅट्री विमानतळावर थांबविण्यात आले.


50 प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला


रविवारी फ्रेंच अधिकाऱ्यांनी रोमानियन कंपनी लीजेंड एअरलाइन्सच्या A340 विमानांना त्यांचा प्रवास पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 50 प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रयाची कागदपत्रे दाखल केली आहेत. तर इतर अनेकांनी भारतात जाण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे. फ्रेंच वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी या माघारीमुळे नाखूष आहेत. या प्रवाशांना त्यांना निकाराग्वाला त्यांचा प्रवास नियोजनाप्रमाणे सुरू ठेवायचा होता. 


दोन प्रवाशांना परत येऊ दिले नाही


'ले मॉंडे' वृत्तपत्रानुसार, प्रभारी स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, विमान उड्डाणाला काहीसा उशीर होणार आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे की दोन प्रवाशांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. या प्रवाशांवर मानवी तस्करीचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मध्य अमेरिकन देश निकाराग्वामार्गे हे लोक अमेरिकेत घुसखोरी करण्याचा कट रचत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या लोकांकडे निकाराग्वासाठी व्हिसा आहे, परंतु तेथून परतण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.


आश्रय मागणारे वगळता उर्वरित प्रवासी भारतात परतणार


स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत नसलेले आणि आश्रयासाठी अर्ज न केलेले सर्व प्रवासी परतीच्या प्रवासाला निघणे अपेक्षित आहे. काही वृत्तानुसार, सुमारे चार डझन प्रवाशांनी आश्रयासाठी अर्ज दाखल केले आहेत. एअरलाइनच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी तपाससाठी उपलब्ध असेल आणि ग्राहकाकडून नुकसान भरपाई मागितली जाईल कारण तिचे महत्त्वपूर्ण नुकसान झाले आहे. रविवारी विमानतळ एका तात्पुरत्या न्यायालयीन संकुलात बदलले आणि चार फ्रेंच न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केली.


बहुतांश प्रवासी हिंदी आणि तमिळ भाषिक आहेत.


मानवी तस्करीच्या संशयावरून पॅरिस अभियोजक कार्यालयाने सुरू केलेल्या तपासाचा भाग म्हणून ही सुनावणी घेण्यात आली. फ्रेंच मीडियानुसार, काही प्रवासी हिंदीत तर काही तामिळमध्ये बोलत होते. विमानाला रवाना होण्यासाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर फ्रेंच न्यायमूर्तींनी रविवारी प्रक्रियेतील अनियमिततेमुळे सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांमध्ये 21 महिन्यांचे एक लहान मुल आणि कोणाचीही सोबत नसलेले 11अल्पवयीन आहेत. 



निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध आहे?


निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन समजला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांची विशेष चौकशी केली जात नाही.