Frace Flight : भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान फ्रान्सने रोखले आहे. या विमानात 303 भारतीय नागरिक होते. या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संशय फ्रेंच यंत्रणांना आहे. एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना समोर आली आहे. मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विट करून हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी नकार दिल्यानंतर मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आले.
फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, भारतातून निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीसाठी वापरले जाऊ शकते. या विमानाने संयुक्त अरब अमिरातीहून उड्डाण घेतले होते. या प्रवाशांच्या प्रवासाच्या परिस्थिती आणि हेतूंबाबत न्यायालयीन चौकशी सुरू झाल्याची माहिती फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिली आहे. मानवी तस्करीच्या संशयावरून अधिकारी तपास करत होते.
विमानाबाबत अधिक माहिती काय?
दुबईहून उड्डाण घेतलेल्या रोमानियन चार्टर कंपनीच्या विमानाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर ते तांत्रिक थांबण्यासाठी छोट्या वॅट्री विमानतळावर उतरवण्यात आले. या ठिकाणी आता प्रवाशांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानातील भारतीय नागरिकांना आणखी किती दिवस ठेवण्यात येईल किंवा त्यांना भारतात पाठवण्याची तयारी आहे का, हे फ्रेंच अधिकाऱ्यांनी अद्याप सांगितलेले नाही.
दोन जण ताब्यात
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संघटीत गुन्हेगारी तपासात तज्ज्ञ असलेली एक युनिट मानवी तस्करीच्या संशयावरून तपास करत आहे. तपास यंत्रणांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.
निकाराग्वा आणि मानवी तस्करी यांचा काय संबंध आहे?
निकाराग्वा हा मध्य अमेरिकन देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेस होंडुरास, पूर्वेस कॅरिबियन, दक्षिणेस कोस्टा रिका आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांसाठी हा देश नंदनवन समजला जातो. दरवर्षी हजारो अवैध स्थलांतरित या देशातून अमेरिका-मेक्सिको सीमेवर पोहोचतात. बेकायदेशीर स्थलांतरितांनाही या मार्गावर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात भौगोलिक स्थान आणि चोरी, दरोड्यासारख्या घटनांचा समावेश होतो. निकाराग्वामध्ये या स्थलांतरितांवर विशेष तपास केला जात नाही.