North Korea Ballistic Missile Test : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) आधुनिक शस्त्रास्त्रांची शर्यत कमी करण्याच्या मोठ्या देशांच्या योजनांना हरताळ फासताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात क्षेपणास्त्र चाचणी करूनही किम जोंग उन हटत नाहीयेत. मंगळवारी उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागून जगाला थक्क केले. जपानच्या तटरक्षक दलानेही उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी घेतल्याची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरियानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी लष्कराला अधिक लष्करी प्रगती करण्याचे आवाहन केल्यानंतर लगेचच दुसरे प्रक्षेपण झाले, असे जपानी तटरक्षक दलाने सांगितले. दक्षिण कोरियाच्या लष्करानेही याला दुजोरा दिला आहे. मात्र चाचणी करण्यात आलेले क्षेपणास्त्र बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे की इतर कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने सांगितले की, आपण लक्ष्यावर मारा करणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या झाली आहे. आठवडाभरात दुसऱ्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर जपान आणि दक्षिण कोरियाची मात्र चिंता वाढली आहे.


किम जोंग उनचा हेतू काय?
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या या कृतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांततेवर वाईट परिणाम होऊ शकतो. किम जोंग उनला उत्तर कोरियात सत्तेत राहून 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. अमेरिकेसोबतच्या राजनैतिक अडथळ्याच्या दरम्यान मागील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आणि नवीन धोरणांवर चर्चा करण्यासाठी उत्तर कोरियाने गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण राजकीय परिषद सुरू केली. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असतानाही किम जोंग उन आपले सैन्य अधिक मजबूत करण्यासाठी सतत नवनवे प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत.



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha