H1B Visa: '24 तासाच्या आता अमेरिकेत दाखल व्हा' H1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टची वॉर्निंग, ट्रम्प यांच्या एका निर्णयानं घडामोडींना वेग
H-1B Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं मायक्रोसॉफ्टनं भारतात आलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं 24 तासात परत यावं, असं सांगितलं आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची फी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आता H-1B व्हिसाची फी 1 लाख अमेरिकन डॉलर्स केली आहे, जी यापूर्वी 1 हजार डॉलर्स होती. नव्यानं H-1B व्हिसाची फी 88000 रुपयांवरुन 88 लाखांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट कंपनीनं विदेशातील कर्मचाऱ्यांना प्रामुख्यानं भारतीय कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला आहे. ज्यामध्ये एका दिवसात अमेरिकेत दाखल होण्यास सांगितलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टनं भारताच्या दौऱ्यावर असलेल्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना तात्काळ ई-मेल पाठवला आहे. त्यानुसार 21 सप्टेंबरनंतर अमेरिकेत येण्यापासून रोखलं जाईल. मायक्रोसॉफ्टनं कर्मचाऱ्यांना इशारा देताना म्हटलं की 21 सप्टेंबरनंतर अमेरिकेच्या बाहेरच्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्याला तोपर्यंत परत येण्याची परवानगी दिली जाणार नाही जोपर्यंत त्यांना नोकरी देणारी कंपनी 1 लाख डॉलर्सचं शुल्क भरणार नाही. तोपर्यंत केवळ आवश्यकता असलेल्या उच्चस्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचं शुल्क भरलं जाईल. यातून हे स्पष्ट होतं की नोकरीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून 21 सप्टेंबरपूर्वी कर्मचाऱ्यांनी अमेरिकेत दाखल व्हावं.
मायक्रोसॉफ्टनं अमेरिकेत असलेल्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना त्यांचा विदेश दौरा रद्द करण्यास सांगितलं आहे. येत्या काळात अमेरिकेत थांबा, असंही सांगण्यात आलं आहे.
भारतातून लवकर परत यावं :मायक्रोसॉफ्ट
भारताच्या दौऱ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर परत येण्यास मायक्रोसॉफ्टनं सांगितलं आहे. नियम लागू होण्यापूर्वी तातडीनं अमेरिकेत दाखल व्हा, असं सांगण्यात आलं आहे. H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांमध्ये भारतीयांचं प्रमाण 70 टक्के आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयानं अमेरिकेत कार्यरत असलेल्या भारतीय टेक कंपन्यांना धक्का बसला आहे. याचा भारतात कार्यरत असलेल्या आयटी सेक्टरवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो.
21 सप्टेंबर 2025 पासून अमेरिकन कंपन्यांना कोणत्याही विदेश कर्मचाऱ्याला नोकरी द्यायची असेल किंवा त्याला पुन्हा देशात प्रवेश द्यायचा असल्यास H-1B व्हिसा अर्जासोबत 1 लाख डॉलर म्हणजेच 88.10 लाख रुपये भरावे लागतील. हा नियम विदेशी कर्मचाऱ्यांवर लागू होणार आहे, ज्यांच्याकडे H-1B व्हिसा आहे किंवा जे अर्ज करत आहेत. जे H-1B व्हिसाधारक सध्या भारतात आले आहेत ते जर 21 सप्टेंबरनंतर अमेरिकेत गेले तर त्यांची कंपनी जोपर्यंत 88 लाख रुपये भरणार नाही तोपर्यंत अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.























