(Source: Poll of Polls)
Corona News : अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, भारतातही रुग्णसंख्येत चढउतार कायम
गेल्या महिनाभरात अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
Corona News : अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य अधिकारी 50 वर्षांखालील लोकांसाठी दुसऱ्या COVID-19 लस बूस्टर डोसची पात्रता वाढवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने मार्चच्या अखेरीस लसीचा दुसरा बूस्टर डोस 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी अधिकृत केला होता.
दरम्यान, 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी चौथ्या डोसच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. FDA कडून कारवाईची आवश्यकता असल्याचे मत यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन डायरेक्टर रोशेल वॅलेन्क्सी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या पाच आठवड्यात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांच्या दैनंदिन प्रकरणांची सरासरी मागील आठवड्याच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढून 94,000 प्रकरणे झाली आहेत. गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. हॉस्पिटलायझेशनसाठी सात दिवसांची सरासरी दररोज 19 टक्क्यांवर गेली आहे. तर मृत्यूची सरासरी दररोज 275 होती अशी माहिती देण्यात आली आहे.कोरोनामुळे ज्यांची जीव गेली ही नक्कीच एक शोकांतिका असल्याचे वॉलेन्स्की यांनी सागितले. अजूनही दिवसाला 300 जणांचा मृत्यू होतो ही खूप चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतात रुग्णसंख्येत चढ उतार
भारतात देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार कायम असल्याचे चित्र दिसत आहे. काल देशात 1 हजार 829 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 1 हजार 569 नवीन कोरोना रुग्ण आणि 19 जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. तसेच सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनारुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जारी करत याबाबत माहिती दिली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 647 वर पोहोचली आहे.
महराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात काल रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केला आहे. काल नव्या 307 रुग्णांची भर पडली आहे तर 252 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,32,81 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 1 हजार 605 सक्रिय रुग्ण आहेत.