(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Palestine Hamas War : इस्रायल-हमासमध्ये युद्ध; दोन दिवसात 1000 जणांचा मृत्यू; जगभरात चिंता व्यक्त
Israel - Hamas War : इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन दिवसात 1000 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
तेल अवीव, इस्रायल : पॅलेस्टिनमधील (Palestine) हमास (Hamas) या अतिरेकी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत एक हजार जणांना प्राण गमवावे लागले आहे. यामध्ये नागरिकांचाही समावेश आहे. यामध्ये बहुतांशीजण इस्त्रायली आहेत. हमासने आतापर्यंतचा मोठा हल्ला केला आहे. जगभरात या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिन युद्धावर चीननेही सकाळी भाष्य केलं. इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील हिंसाचाराच्या 'वाढल्याबाबत खूप चिंतित असल्याचं चीनने म्हटलं आहे.
हमासच्या हल्ल्यात इस्त्रायलमधील 600 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आणि तर जवळपास दोन हजार इस्त्रायली नागरीक जखमी झाले आहेत. इस्त्रायलच्या प्रतिहल्ल्यात 400 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हमासच्या विरोधात आता रणगाडे उतरवले आहेत. हे रणगाडे दक्षिण भागात तैनात करण्यात आले आहेत. इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाच्या स्थानांवर ड्रोन हल्ले सुरू करून प्रत्युत्तर दिले आहेत. हा भाग इस्रायल, लेबनॉन आणि सीरियाला लागून आहे. इस्रायलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कराने 400 दहशतवाद्यांना ठार केले असून अनेक दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी गाझामधील 426 लक्ष्यांवर हल्ले केले आणि मोठ्या स्फोटांनी अनेक निवासी इमारती नष्ट केल्या.
सकाळी इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी देशाला संबोधित करताना ओलिस ठेवलेल्या प्रत्येक इस्त्रायली नागरिकाची जबाबदारी ही हमासची असून आम्ही हमासच्या नेत्यांच्या गाझा पट्ट्यातील प्रत्येक जागेला लक्ष्य करून त्यांना शोधून काढू असं म्हटलं आहे. इस्रायलचे लोक रक्तदान करण्यासाठी एकत्र येत आहेत आणि त्यांची एकता दाखवत आहेत.
ज्या ठिकाणी हमासची लोकं तैनात किंवा लपून आहेत ती ठिकाणी आम्ही नेस्तनाबूत करू. गाझातील रहिवांश्यांनी गाझा पट्टी खाली करावी कारण आम्ही या ठिकाणी जोरदार कारवाई करण्याच्या तयारीत आहोत, असेही इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी म्हटले.
दरम्यान जर्मनी, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हमास, पॅलेस्टिनच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर आले. पॅलेस्टाईनच्या भूभागावरून इस्रायलने माघारी जावे, अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.
एअर इंडियाकडून फेऱ्या रद्द
एअर इंडियाने १४ ऑक्टोबरपर्यंत भारतातून इस्त्रायल आणि (तेल अवीव) इस्त्रायलमधून भारतात येणाऱ्या विमानाच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत. प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. यानंतर एअर फ्रान्सनेही प्रवाश्यांच्या सुरक्षेचा विचार करत इस्त्रायलसाठीची विमानसेवा तात्पुरती रद्द केली आहे.
10 नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू
हमासच्या हल्ल्यात 10 नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इस्त्रायलमधील नेपाळी दूतावासाने दिली आहे.