(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISISच्या म्होरक्यानं कुटुंबासह स्वत:ला बॉम्बनं उडवलं; अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी 'ऑपरेशन' लाईव्ह पाहिलं!
आयएसआयएसचा (ISIS) प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या कारवाईत ठार झाला आहे.
ISIS : आयएसआयएसचा (ISIS) प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या कारवाईत ठार झाला आहे. अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अल कुरेशीने त्याच्या कुटुंबासह स्वत:ला बॉम्बस्फोटाने उडवले. या मोहिमेदरम्यान कुरेशीसह 13 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मिशनमधील सर्व अमेरिकन सैनिक सुखरूप परतले आहेत.
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने लाईव्ह पाहिले.
Last night at my direction, U.S. military forces successfully undertook a counterterrorism operation. Thanks to the bravery of our Armed Forces, we have removed from the battlefield Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi — the leader of ISIS.
— President Biden (@POTUS) February 3, 2022
https://t.co/lsYQHE9lR9
बिडेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "काल रात्री यू.एस. सशस्त्र दलांनी दहशतवादविरोधी मोहीम यशस्वीपणे राबवली. आमच्या सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम. आम्ही ISIS चा म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी याला युद्धभूमीतून हटवलं आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'मोहीम यशस्वी झाली. यात कोणतीही अमेरिकन जीवितहानी झाली नाही.
अल कुरेशीने स्वत:ला उडवले
व्हाईट हाऊसने सांगितले की अबू इब्राहिम अल-हाशिमी अल कुरैशीने स्वतःला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बॉम्बस्फोट करत संपवलं. मिशनमध्ये 24 स्पेशल ऑपरेशन कमांडोचा समावेश होता, ज्यांच्या सोबत जेट्स, रीपर ड्रोन आणि हेलिकॉप्टर गनशिप होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन सैन्याची ही कारवाई उत्तर-पश्चिम सीरियामध्ये करण्यात आली. 2019 मध्ये ज्या भागात ISIS चा पूर्वीचा नेता अबू बकर अल-बगदादीचा अमेरिकेच्या विशेष सैन्याने खात्मा केला त्याच भागात ही कारवाई केली. 2011 मध्ये ओसाम बिन लादेनवर ज्याप्रमाणे ऑपरेशन करण्यात आले होते आणि त्यात ओसामा मारला गेला होता त्याच पद्धतीने हे ऑपरेशन करण्यात आले.
हेलिकॉप्टरद्वारे यू.एस कमांडोंनी घराला वेढा घातला आणि लाऊडस्पीकरद्वारे महिला आणि मुलांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. मात्र अल कुरेशीच्या आत्मघाती बॉम्बस्फोट करत स्वत:सह कुटुंबालाही संपवलं.
अबु इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी, ज्याला अब्दुल्ला करादाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणूनही ओळखले जायचे. हा माजी ISIS प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा नेता बनला. अबू बकर अल-बगदादीने देखील 2019 मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्याने केलेल्या अशाच हल्ल्यात स्वतःला स्फोट घडवून आणले.