(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता सेकंदात 10 हजार HD चित्रपट डाऊनलोड होणार; प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा जपानचा दावा
जपानने वेगाच्या बाबतीत आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
टोकिओ : जपानने तंत्रज्ञानामध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. सर्वात वेगवान बुलेट ट्रेनही जपाननेच विकसित केली आहे. आता आणखी एका वेगवान विक्रमाला गवसणी घालण्याचा दावा जपानने केला आहे. प्रति सेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड साध्य केल्याचं जपानने म्हटले आहे. म्हणजे एका सेकंदात दहा हजार एचडी मूव्ही डाऊनलोड होऊ शकणार आहेत. यात 1,864 मैल लांबीच्या ऑप्टिकल केबलचा वापर करण्यात आला आहे. हा वेग आतापर्यंतचा सर्वाधिक मानला जात आहे. हा स्पीड मिळाल्यानंतर तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल होतील.
जपानी संशोधकांनी 1,864 मैलांच्या ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून डाटा ट्रान्सफरच्या गतीचा विक्रम केला आहे. हे इतके जलद आहे की सरासरी 4 जीबी असलेल्या 10,000 हाय डेफिनिशन चित्रपट केवळ एका सेकंदात हस्तांतरित करू शकता.
अशा प्रकारचे तंत्रज्ञान ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या बॅक-एंड नेटवर्कमध्ये वापरले जाते आणि नंतर शेकडो किंवा हजारो ग्राहकांमध्ये विभाजित होते.
या नवीन विक्रमाने पूर्वीचे प्रतिसेकंद 172 टेराबाईटचा विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम अगोदर जपानची राष्ट्रीय माहिती व दळणवळण संस्थेच्या नावावर होता. नवीन प्रणाली विद्यमान पायाभूत सुविधांशी सुसंगत आहे, म्हणजे नेटवर्क सहजपणे अपग्रेड केले जाऊ शकते, कारण केबल समान आकाराचे आहे, असे टीमने स्पष्ट केलंय.
संशोधकांचे म्हणणे आहे की बॅक-एंड-इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अशा प्रकारची गती आवश्यक असेल कारण, इंटरनेट सेवा मागणाऱ्यांना जास्त स्पीडच्या इंटरनेटची आवश्यता असते. यात आता 5G नेटवर्कची वेगवान गती तसेच डाटा ट्रान्सफर आणि इंटरनेट यांचा समावेश आहे.
हा वेग मिळवण्यासाठी संशोधकांनी फोर-कोर ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला आहे. या केबलमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या सिंगल ट्युबपेक्षा फोर ऑप्टिकल फायबर ट्यूबमध्ये डाटा वाहून नेण्याची क्षमता अधिक आहे. यामुळे जास्त अंतरात येणारा सिग्नलमध्ये येणारा अडथळा दूर झाला आहे. नवीन तंत्रज्ञाम मागील रेकॉर्ड ब्रेकिंग सिस्टमसारखेच आहे. फक्त यात आणखी एक कोर आहे. त्यानंतर डेटा 'वेव्हलेन्थ-डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग' वापरुन प्रसारित केला जातो, हे तंत्रज्ञान लेसरद्वारे डेटा बीम घेते आणि 552 चॅनेलमध्ये विभाजित करते.