(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel Advisory: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवसांच्या क्वारंटाईनमधून सूट; सरकारकडून नियमावली मागे
Travel Advisory: सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी 1 ऑक्टोबर रोजी जारी केलेली प्रवास सल्लागार मागे घेतली आहे.
Travel Advisory: सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त तपासणी आणि निर्बंधाशी संबंधित कोरोना ट्रव्हल एडव्हायझरी (Travel Advisory) मागे घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली. 1 ऑक्टोबर 2021 पासून भारतात येणाऱ्या यूकेच्या नागरिकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे मागे घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
ट्रव्हल एडव्हायझरीत काय होते?
त्यात म्हटले होते की भारतात येणाऱ्या यूकेतील नागरिकांना घरी आल्यानंतर किंवा दिलेल्या निर्धारीत पत्त्यावर 10 दिवसांसाठी अनिवार्यपणे अलग ठेवण्यात येईल. यासोबतच, ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी आणि भारतात आल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी घेण्याबाबत चर्चा झाली होती.
भारत सरकारचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन फोनवर बोलले होते. या दरम्यान, दोन्ही नेत्यांनी कोरोना विषाणूविरूद्ध सामान्य लढा आणि काळजीपूर्वक आंतरराष्ट्रीय प्रवास उघडण्याचे महत्त्व यावर चर्चा केली.
यापूर्वी, ब्रिटनने ठरवले होते की कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना आगमनानंतर अलग ठेवण्याची गरज नाही. ब्रिटिश सरकारने काही दिवसांपूर्वी नवीन नियम जारी केले होते. या नियमांमध्ये असे म्हटले होते की, भारतासह इतर काही देशांमधून प्रवास केल्यानंतर ब्रिटनमध्ये आलेल्या व्यक्तीला 10 दिवस अलग ठेवणे आणि कोविड -19 ची चाचणी करावी लागेल. एवढेच नाही तर ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाही अलग ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारताने या नियमाला तीव्र आक्षेप घेतला होता आणि तो भेदभाव करणारा नियम असल्याचे म्हटले होते.
या घटनेनंतर भारताने देशील ब्रिटिनहून येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन राहणे अनिवार्य केले होते. सोबतच विमानतळावर आरटी-पीसीआर (RTPCR) चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता दोन्ही नेत्यांच्या फोनवरील चर्चेनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना अशीच सूट मिळण्याची आशा आहे.