Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे इस्रायलमधून भारतासह इतर सात देशांत जाण्यास बंदी
Coronavirus कोरोनाचा वाढता धोका पाहता इस्रायल सरकारकडून देशात येणाऱ्यांसाठी काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
Coronavirus फोफावणारा कोरोना संसर्ग पाहता इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ज्याअंतर्गत शासनाकडून इस्रायलमध्ये येणाऱ्या नागरिकांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतासह कोरोनाचा अतीव धोका असणाऱ्या सात देशांत प्रवास करण्यास इस्रायलनं बंदी घातली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार युक्रेन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, मेक्सिको आणि टर्की या देशांचा या यादीत समावेश आहे. इस्रायल पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या संयुक्त पत्रकातून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. या नव्या नियमाची अंमलबजावणी 3 मे पासून करण्यात येणार आहे. 16 मे पर्यंत हे नियम लागू असतील. मुख्य म्हणजे, हा नियम फक्त इस्रायली नागरिकांसाठीच लागू असणार आहे. या देशाचे मूळ रहिवासी नसणाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे, त्यामुळं ही मंडळी या देशाचा प्रवास करु शकणार आहेत.
असं असलं तरीही कनेक्टिंग फ्लाईटसाठी सदर देशांतील विमानतळांवर 12 तासांहून अधिक कालावधीसाठी प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी मात्र हा नियम लागू नसेल. या साठी इस्रायल सरकारकडून एक समितीही स्थापन करण्यात आली आहे.
कोरोनाचा धोका अधिक असणाऱ्या, वर नमूद करण्यात आलेल्या देशांतून इस्रायलमध्ये परतणाऱ्यांसाठी दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी अनिवार्य असेल. या व्यक्तींनी लस घेतलेली असेल तरीही त्यांना विलगीकरणाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. तर, कोरोना चाचणीचे दोन अहवाल निगेटीव्ह आलेल्यांसाठी विलगीकरणाचा कालावधी 10 दिवसांचा असेल.
देशातील कोरोनाची लाट धडकी भरवणारी
भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. रोजच्या रोज मोठ्या संख्येने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाच्या 3.92 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर मृतांचा आकडा 3689 इतका झाला आहे. शुक्रवारी देशात चार लाख रुग्ण संख्या वाढली होती. देशातील कोरोनाची रोजची ही वाढती आकडेवारी चिंताजनक आहे.