वॉशिंग्टन : जगभरातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच देशभरातील 50 राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत आपत्ती कायदा लागू करण्यात आला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने हैदोस घातला असतानाच अमेरिका जणू कोरोनाचं नवं केंद्र बनली आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या काही लाखांमध्ये असून आतापर्यंत या आजाराने 22 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केलं आहे की, 'इतिहासात पहिल्यांदाच देशातील 50 राज्यांमध्ये संपूर्णपणे आपत्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कधीच न पाहिलेल्या शुत्रूशी युद्ध सुरू आहे. विजय नक्कीच आपला असेल.'
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांच्याकडून मोदींचे आभार
काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले होते. परंतु, भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला पुरवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीचाही उल्लेख केला होता.
पाहा व्हिडीओ : इंडोनेशियात जनजागृतीसाठी पोलिस बनले सुपरहिरो!
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सर्वाधिक लोकांचा बळी गेला आहे. तर देशातीलल मृतांचा आकडा 22 हजार पार गेला आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त झाली आहे. अमेरिकेनंतर इटलीमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या दिड लाखांहून अधिक झाली आहे.
जगभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या 18 लाख पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 12 हजारांवर पोहोचला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, इटलीमधील मृतांच्या आकड्यात गेल्या तीन आठवड्यांपासून घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या :
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू