न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर नऊ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र 6 एप्रिलला सकाळी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. कांचीबोटला हे अमेरिकेत युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते. 66 वर्षीय ब्रह्म कांचीबोटला यांनी अमेरिकेत 26 वर्ष काम केलं होतं.

न्यूयॉर्कमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या 9 दिवसांपासून ते दवाखान्यात भर्ती झाले होते. उपचारादरम्यान त्यांचं सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोकसंदेश दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, पत्रकार ब्रह्म कांचीबोटला आपल्या चांगल्या कामासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्रकारितेला नेहमी स्मरणात ठेवलं जाईल.

पंतप्रधान मोदी यांचं ट्वीट
पत्रकार कांचीबोटला यांच्या निधनानंतर मोदी म्हणाले की, 'भारतीय अमेरिकी पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाने खूप दुखी आहे. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशाला जवळ आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचं हे योगदान नेहमी स्मरणात राहील. मी त्यांच्या परिवार आणि दोस्तांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती' असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे.


युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते कांचीबोटला 

ब्रह्म कांचीबोटला हे 66 वर्षांचे होते. ते युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपल्या 28 वर्षांच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये 11वर्ष फायनांन्शियल पब्लिकेशनमध्ये कंटेंट एडिटर म्हणून काम केलं आहे. त्यांनी यानंतर न्यूज इंडिया टाइम्स वीकली मध्ये देखील काम केलं आहे.

अमेरिकेत कोरोनाचा कहर
जगभरात कोरोनाचे रुग्ण 14 लाख 30 हजारापेक्षा जास्त झाले आहेत तर बळींची संख्या 82हजारांच्या वर गेली आहे. यातले तीन लाख २ हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास दहा लाख 43 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील पाच टक्के म्हणजे 48 हजार गंभीर आहेत. अमेरिकेत कोरोनाने काल तब्बल 1970 लोकांचा बळी घेतला, तिथे मृतांचा एकूण आकडा 12841 झाला आहे. अमेरिकेत रुग्णांची संख्या चार लाखांच्या वर पोहोचली आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल 731 बळी गेले आहेत. तिथे रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार तर एकूण मृतांचा आकडा 5489 झाला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 1223, मिशिगन मध्ये 845, लुईझियाना 582, कॅलिफोर्निया 434 आणि वॉशिंग्टनमध्ये 403 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.