वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली आहे.


व्‍हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता ट्रम्प म्हणाले की, "भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या औषधाच्या ऑर्डरवरील बंदी भारत उठवणार नाही, यासाठी असं होणार नाही. मला कल्पना आहे की भारताने हे औषध इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. आमच्यात चांगला संवाद झाला. भारताचे अमेरिकेसोबत संबंध कायमच चांगले राहिले आहेत."


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. हे औषध अमेरिकेला देण्यासंदर्भात विचार करु, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्याबाबत ट्रम्प म्हणाले की, "रविवारी सकाळी आमच्यात बातचीत झाली होती. तुम्ही आम्हाला औषध दिलं तर निश्चितच या निर्णयाचं कौतुक करु. मात्र हे औषध अमेरिकेला देण्यासाठी परवानगी दिली नाही तर ठीक आहे, परंतु निश्चितच याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं आणि असं का होऊ नये?"


आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो : ट्रम्प
ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिकेच चांगले व्यापारी संबंध आहे. जर भारताने औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करुन कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे मलेरियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं औषध आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरही हे औषध फायदेशीर ठरत आहे.


कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. इटली, स्पेनसारख्या विकसित देशांनीही या व्हायरसमोर गुडघे टेकले आहेत. आता महासत्ता असलेल्या अमेरिकेची नजरही आता भारताकडे आहे. भारताकडून मदत मिळण्याची आस अमेरिकेला आहे. ट्रम्प यांच्यामते कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे औषध परिणामकारक ठरत आहे.


भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक
भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मलेरियामुळे मृत्यू होता. त्यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. आता हे औषध कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. परंतु कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे या औषधाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जागतिक लॉकडाऊनमुळे भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी यासाठी आवश्यक कच्चा माल एअरलिफ्ट करुन मागवण्याची विनंती सरकारकडे केली आहे.