King Charles-III: राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स (Prince Charles ) हे ब्रिटनचे राजे म्हणून आज पदग्रहण करणार आहेत. प्रिन्स चार्ल्स हे राजे चार्ल्स तिसरे (King Charles-III) म्हणून ओळखले जाणार आहेत. भारतीय प्रमाण वेळ दुपारी 2.30 वाजता सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केले जाईल. याआधी चार्ल्स यांनी ब्रिटनचे महाराज म्हणून शुक्रवारी पहिल्यांदा बर्मिंगहॅम पॅलेसमध्ये दाखल झाले होते.
प्रिन्स चार्ल्स यांनी पत्नी कॅमिलासह लंडन येथे परतल्यानंतर ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची भेट घेतली. तर, ब्रिटनला त्यांनी महाराजाप्रमाणे संबोधित केले. महाराज चार्ल्स यांनी आपल्या भाषणात दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांचे आभार मानत आजीवन जनसेवेची शपथ घेतली. त्याशिवाय, बर्किंघम पॅलेस बाहेर असलेल्या लोकांची त्यांनी भेट घेत महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावरील सात्वंना स्वीकारली. महाराणी एलिझाबेथ यांच्याप्रमाणे पुढे आपण काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
महाराणी एलिझाबेथ यांच्यासाठी कॅथेड्रलमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. ऑपरेशन यूनिकॉर्ननुसार महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव तूर्तास स्कॉटलंड येथील होलीरुड निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. एलिझाबेथ यांचे पार्थिव 13 सप्टेंबर रोजी लंडन येथे नेण्यात येणार आहे. तर, आज महाराज चार्ल्स तिसरे यांना सेंट जेम्स पॅलेसत्या बाल्कनीतून राजा म्हणून जाहीर केले जाईल.
आज होणाऱ्या पदग्रहण कार्यक्रमात सुमारे 700 पाहुणे सहभागी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्येष्ठ खासदारांचा एक गट, काही अधिकारी, राष्ट्रकुल देशातील उच्चायुक्त आणि लंडनचे लॉर्ड महापौर सहभागी होतील. कमी वेळेत पदग्रहण सोहळा आयोजित झाल्याने अनेक पाहुणे या कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते.
महाराणींचे निधन, भारतात दुखवटा
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth Death II) यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रविवारी, 11 सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय दुखवटा (One Day State Mourning) जाहीर करण्यात आला असून या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Elizabeth II : भारताशी खास नातं; महाराणी एलिझाबेथ यांचा तीन वेळेस भारत दौरा
- वयाच्या 25व्या वर्षी राजगादीवर विराजमान, तब्बल सात दशकांचा राजेशाही प्रवास; कोण होत्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ?