Boston Tea Party : समुद्रात चहा फेकून दिला अन् अमेरिकेत क्रांतीची ठिणगी पेटली; अमेरिकेला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या बोस्टन टी पार्टीचा इतिहास काय?
ब्रिटिशांनी अमेरिकेत चहावर कर लावला आणि लोक चांगलेच भडकले. चहाच्या पेट्या समुद्रात फेकून देण्यात आल्या आणि स्वातंत्र चळवळीला गती मिळाली.
Boston Tea Party Histoty : भारतात सर्वसामान्यांच्या रोजच्या गरजेच्या असलेल्या मिठावर कर (India Salt Tax) लावला आणि महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची (Civil Disobedience Movement) चळवळ सुरू करत देश ढवळून काढला, पुढे स्वातंत्र्य मिळालं. तशीच घटना अमेरिकेत सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी घडली होती. पण तिथे मीठ नव्हे तर चहाने अमेरिकन क्रांती (American Revolution) फुलवली आणि नंतर ती आग पेटून देश स्वातंत्र्य झाला. 4 जुलै 1776 रोजी अमेरिका या ब्रिटिशांच्या वसाहतीला स्वातंत्र्य मिळालं. यंदा अमेरिका 274 वा स्वातंत्र्यदिन (United States Independence Day) साजरा करत असून त्यानिमित्ताने बोस्टन टी पार्टी नेमकी काय आहे आणि त्याचा इतिहास (Boston Tea Party History) काय आहे हे जाणून घेऊया.
अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 16 डिसेंबर 1773 रोजी घडलेल्या बोस्टन टी पार्टी घटनेचं मोठं महत्व (Boston Tea Party Importants) आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध सुरू झालेली ही पहिली चळवळ होती. याच घटनेमुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला गती मिळाली. ना प्रतिनिधी ना कर (No Representative No Tax) या सूत्राचा वापर करत अमेरिकन जनता आता विनाकारण कोणताही कर देणार नाही असा संदेश ब्रिटिशांना दिला. हे आंदोलन अमेरिकेतील सर्व म्हणजे 13 वसाहतींपर्यंत पोहोचले आणि स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला.
आताची महासत्ता असलेली अमेरिका एकेकाळी ब्रिटिशांची अंकित. अमेरिगोने अमेरिकेचा शोध लावला आणि त्या भल्यामोठ्या जमिनीवर ब्रिटिशांनी ताबा मिळवला. मग त्या ठिकाणी धान्य पिकवण्यासाठी शेतकरी, उद्योगासाठी कामगार आणि इतर सर्व गोष्टी करण्यासाठी जी लोक आली ती ब्रिटिशच. ब्रिटिश साम्राज्याच्या भल्यासाठी या प्रदेशाचा उपयोग करण्यात येत होता.
अमेरिकेत कराचा बोजा, चहावर कराने लोक भडकले
ब्रिटनमधील लोक सुखी राहावेत, ऐशोआरामात जगावेत यासाठी भारतासोबत अमेरिकेवरही वेगवेगळे कर लावण्यात येत होते. नंतर ब्रिटनच्या डोक्यावरचे कर्ज वाढत गेले, मग अमेरिकेवरील करांमध्येही भरमसाठ वाढ करण्यात आली. अमेरिकेतल्या कागदावरही कर (The Stamp Act of 1765) लावण्यात आला, यातून पत्त्यांसाठी लागणारे कागद आणि वत्तपत्रंही सुटले नाहीत. त्यानंतर पेंट, ग्लास, शिशे आणि चहावरही कर (Tea Tax In America) लावण्यात आला. सगळं राहू दे... पण रोजच्या चहावरही कर? या अतिरेकी कराने मात्र लोक चांगलेच भडकले.
ना प्रतिनिधी ना कर...
एक तर अमेरिकन लोकांना ब्रिटनच्या संसदेत (British Parliament) कोणतेही प्रतिनिधित्व देण्यात आलं नव्हतं, त्यातून वर हे कर लावले. ना प्रतिनिधी, ना कर (No Representative No Tax) या धोरणानुसार अमेरिकन नागरिकांना जोपर्यंत ब्रिटनच्या संसदेत प्रतिनिधीत्व देण्यात येत नाही तोपर्यंत कोणताही कर अमेरिकेतून देण्यात येणार नाही अशी भूमिका नेत्यांनी घेतली. या करापाई अमेरिकन लोक हातघाईवर आले, काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. मग नंतर ब्रिटनने माघार घेऊन चहा सोडून इतर सर्व जाचक कर रद्द केले.
चहाची तस्करी सुरू
दरवर्षी अमेरिकन वसाहती 1.2 कोटी पाऊंड इतका चहा पीत असत, त्यामुळे चहावरचा कर हा कमाईचा मोठा स्त्रोत असल्याचं ब्रिटिशांना जाणीव होती. पण अमेरिकेचा याला विरोध होता. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून (British East India Company) येणाऱ्या चहावर अमेरिकन नागरिकांनी बहिष्कार टाकण्यास सुरूवात केली. अमेरिकेत डच चहाची तस्करी करण्यात येत होती. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लाखो पाऊंड चहा वाया जात होता आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली.
ब्रिटिश संसदेने चहाचा कायदा केला
मे 1773 मध्ये ब्रिटिश संसदेने चहाचा कायदा (USA Tea Act) संमत केला. या कायद्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया (British East India Company) कंपनीला अमेरिकन वसाहतींमध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेत शुल्कमुक्त आणि स्वस्त दरात चहा विकण्याची परवानगी देण्यात आली. पण बंदरात पोहोचल्यावर चहावरील कर सुरूच होता. वसाहतींमध्ये चहाची तस्करी वाढत होती. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीकडून आयात केलेल्या चहाच्या तुलनेत तस्करी केलेल्या चहाचे प्रमाण वाढत होते.
चहा घेऊन जाणारे जहाज जेव्हा अमेरिकेत पोहोचले...
या सगळ्यामध्ये सन्स ऑफ लिबर्टी (Sons of Liberty) नावाचा गटही चहा कराच्या विरोधात आंदोलनात उतरला होता. याच गटाने मुद्रांक कायदा आणि इतर प्रकारच्या करांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. 16 डिसेंबर 1773 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडियाची डार्टमाउथ, बीव्हर आणि एलेनॉर ही तीन जहाजे बोस्टनमधील ग्रिफिनच्या वार्फ (Griffin’s Wharf in Boston Harbour) येथे चहा घेऊन पोहोचली. ही तिन्ही जहाजे चीनमधील चहाने (China Tea) भरलेली होती.
चहा समुद्रात फेकून दिला
अमेरिकन नागरिकांना याची माहिती मिळताच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमू लागले. काहीही झालं तरी चहावर कर भरणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली. या जहाजातून आलेला चहा हा बंदरावर उतरवायचा नाही, त्याची विक्री होऊ द्यायची नाही असा ठराव पास करण्यात आला. मग मध्यरात्रीच्या सुमारास अमेरिकन नागरिक जहाजावर चढले आणि त्यांनी तो सर्व चहा समुद्रात फेकून दिला. बोस्टन बंदरावरील 342 चहाच्या पेट्या (Boston Tea Party) समुद्रात फेकून देण्यात आल्या. यासाठी सुमारे तीन तास लागले. 45 टनाच्या या चहाची किंमत आजचा विचार करता जवळपास आठ कोटी इतकी होती.
त्या जहाजांवरच्या 342 चहाच्या पेट्या समुद्रात फेकल्या आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये क्रांतीची ज्वाला पेटली. ही घटना अमेरिकेच्या इतिहासात बोस्टन टी पार्टी म्हणून प्रसिद्ध आहे. बोस्टन टी पार्टी ही पहिली मोठी चळवळ होती, या चळवळीने अमेरिकन स्वातत्र्यलढ्याला गती दिली.
प्रत्येक देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात काही घटना महत्वाच्या असतात. अमेरिकेच्या इतिहासातही बोस्टन टी पार्टीचे महत्व तितकंच मोठं आहे.