Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
operation midnight hammer : अमेरिकेनं इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात उडी घेतली आहे. इराणच्या तीन आण्विक तळांवर अमेरिकेनं हल्ले केले.

वॉशिंग्टन : अमेरिकेनं इराण विरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवत ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवलं. अमेरिकेनं हे ऑपरेशन केवळ 25 मिनिटांमध्ये पूर्ण केलं. या कालावधीत इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले. इराणच्या फोर्डो, नतान्ज आणि इस्पाहान येथील तळांवर हल्ले करण्यात आले. हे हल्ले 7 स्टील्थ B-2 बॉम्बर्सद्वारे करण्यात आले. इराणच्या आण्विक तळांवर 12 बॉम्ब टाकण्यात आले. या ऑपरेशनमध्ये 125 विमानांचा वापर करण्यात आला यामध्ये इराणची दिशाभूल करण्याची रणनीती राबवली गेली.
अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन जनरल डॅन केन यांनी म्हटलं की 7 स्टील्थ B-2 बॉम्बर्सचा वापर करण्यात आला. फोर्डो आणि नतान्ज येथील आण्विक तलांवर 13608 किलोग्रॅमचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले गेले. इस्फाहानमध्ये टोमाहॉक क्रूझ मिसाईलचा वापर करण्यात आला. अमेरिकेच्या 7 स्टील्थ B-2 बॉम्बर्सनी मिसौरी येथील एअरबेसवरुन उड्डाण घेतलं. 18 तासांच्या या मिशनला शांततेत पारपाडलं गेलं. 7 स्टील्थ B-2 बॉम्बर्समध्ये प्रत्येक विमानात 2-2 क्रू मेंबर्स होते. पूर्ण मिशन कमी कम्युनिकेशन ठेवून करण्यात आलं.
अमेरिकेनं हे हल्ले भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे 4.10 वाजता केले. B-2 बॉम्बर्सनं पहिल्यांदा फोर्डोवर दोन बंकर बस्टर बॉम्ब टाकले. यानंतर नतान्ज आणि इस्फाहानंवर हल्ले करण्यात आले. 4.35 मिनिटांनी अमेरिकेची विमानं इराणच्या हवाई क्षेत्राच्या बाहेर निघून गेली होती.
केन यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणवर अमेरिकेनं 14 बंकर बस्टर बॉम्ब, 24 टोमहॉक मिसाईल चा मारा केला. या मिशनमध्ये 125 लष्करी विमानांचा समावेश होता. मध्य पूर्वेतील संघर्षात अमेरिकेनं हल्ला करण्याची पहिली वेळ आहे. जनरल केन यांच्या माहितीनुसार काही लढाऊ बॉम्ब वर्षाव करणारी विमानं पॅसिफिक महासागरावर सोडण्यात आली, याद्वारे इराणची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला याला डिकॉय मिशन म्हटलं गेलं. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिल्यानंतर हे हल्ले करण्यात आले आहेत. त्यांनी व्हाईटहाऊसमधील सिच्युएशन रुममधून मिशनची देखरेख केली.
केन म्हणाले इराणनं अमेरिकनं विमानांवर त्या देशात जाताना किंवा बाहेर पडताना हल्ला केली नाही. टोमहॉक मिसाईलनं इस्फाहानवर अखेरचा हल्ला केला. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी ऑपरेशन यशस्वी झालं असून इराणचा अणू कार्यक्रम पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला. इराणला अणवस्त्रधारी देश होऊ द्यायचं नाही हा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार असल्याचं पीट हेगसेथ म्हणाले.























