Hiroshima Day : 6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. कारण याच दिवशी 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात 1 लाख 40 हजार नागरिकांनी जीव गमावला होता, तर 9 ऑगस्ट 1945 रोजी 'बॉक्सकार' नावाच्या बी.29 विमानाने 'फॅट मॅन' नावाचा अणूबॉम्ब नागासाकी शहरावर टाकला होता. या हल्ल्यात नागासाकीमधल्या 80 हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. यामध्ये जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले.


नेमक काय घडलं?


6 ऑगस्टच्या सकाळी हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा ‘एनोला गे’ बी-29  बॉम्बरने ‘लिटल बॉय’ युरेनियम गन टाईप अ‍ॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट पावला. या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार आणि आजार यामुळे मृत्यू पावले.


नागासाकीवर बॉम्बस्फोट


बॉम्बस्फोटामुळे झालेल्या विध्वंसानंतरही जपानने शरणागती पत्करली नाही. 9 ऑगस्ट रोजी अमेरिकेने कोकुरा शहराच्या प्राथमिक लक्ष्यासाठी आणखी एक बी-29, बॉक्सकार पाठवले. कोकुरावर असलेल्या दाट ढगांनी पायलट मेजर चार्ल्स स्वीनी यांना बॉम्ब टाकण्यापासून रोखले. म्हणून दुसरा निशाणा डोंगरांमध्ये वसलेल्या नागासाकीवर बसला. त्याने सकाळी 11.02 वाजता ‘फॅट मॅन’ टाकला. हा प्लूटोनियम बॉम्ब हिरोशिमामध्ये वापरलेल्या बॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्यातून 22 किलोटनचा स्फोट झाला.


जपानची शरणागती  


नागासाकी बॉम्बस्फोटानंतर सहा दिवसांनी 15 ऑगस्ट रोजी सम्राट हिरोहितोने जपानच्या आत्मसमर्पणाची घोषणा एका रेडिओ प्रसारणात केली. 2 सप्टेंबर रोजी टोक्यो खाडीवर अँकर केलेल्या अमेरिकन युद्धनौका मिसौरीवर शरण येण्याचा औपचारिक करार झाला. कारण दोन शहरातील बहुतांश पायाभूत सुविधा पुसून टाकल्या गेल्या होत्या. दोन बॉम्बस्फोटांमुळे झालेल्या मृत्यूंची वास्तविक संख्या कधीच कळू शकली नाही.


हिरोशिमा, नागासाकी या शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात दोन हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या. 1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे. या देशांनी आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेतल्या आणि त्याची कबुलीही दिली.


महत्वाच्या बातम्या :