(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात यश
वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वाघोली इथे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Wardha Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वाघोली इथे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुसळधार पावसामुळं वाघोली जवळील मोठ्या नाल्याला पूर आला होता. देवराव पर्बत असे सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तिचे नाव आहे. पाणी प्रवाही असताना पाण्यात कोणीही उतरु नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
हिंगणघाट तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं वाघोली येथील नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्यात देवराव पर्बत हे वाहून गेल्याची घटना घडली. वाहत जात असताना एका झाडाला धरुन ते बसले होते. त्यानंतर नागरिकांनी त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, तहसिल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी वाघोली इथे गावामध्ये मोठ्या प्रमाणत पाऊस झाला. गावालगत नाला असून नाल्याला पूर आल्यामुळं देवराव पर्बत हे पूर पाहण्यासाठी नाल्यावर गेले होते. यावेळी ही घटना घडली.
दरम्यान, घटना घडल्यानंतर पाणी थोडं कमी झाल्यावर गावातील नागरीक नाल्याच्या दोन्ही बाजुंनी देवराव पर्बत यांना शोधण्यासाठी गेले होते. जवळजवळ एक किलोमिटर अंतरावर देवराव पर्बत हे झाडावर बसल्याचे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना नागरिककांनी खाली उतरवून सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, सध्या महाराष्ट्रात विविध भागात चांगला पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
महत्वाच्या बातम्या: