वर्ध्यातील पोथरा नदीला जोडणाऱ्या नाल्यावरील सिमेंटचा रस्ता गेला वाहून, चार ते पाच गावांचा संपर्क तुटला
Wardha News update : वर्धा जिल्ह्यातील वडगाव पिंपळगाव मार्गांवरील पोथरा नदीच्या पात्राला जोडणाऱ्या नाल्याच्या पुलावरील सिमेंट काँक्रेटचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे.
Wardha News update : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने नदी नाले तुडुंब वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. वडगाव पिंपळगाव मार्गांवरील पोथरा नदीच्या पात्राला जोडणाऱ्या नाल्याच्या पुलावरील सिमेंट काँक्रेटचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, शेतकरी आणि व्यवसायिकांना ये- जा करण्यास अडण निर्माण झाली आहे. कमकुवत झालेल्या रस्त्याचा उर्वरित भाग देखील तुटण्याची शक्यता नक्कीच आहे. चार ते पाच गावांची वाट याच रस्त्यावरून असून रस्ता वाहून गेल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.
अपघाताची शक्यता
पोथरा नदीचे पात्र तुडूंब भरून वाहत आहे. नदीचे पाणी पुलावर देखील आले आहे. त्यामुळे वडगाव आणि सावंगी गावाच्या मध्यभागी असलेल्या नाल्यावरील पुलाचे काँक्रेट वाहत गेले. काही काँक्रेट रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. यापूर्वी या पुलावरील काँक्रेट वाहून गेल्यानंतर प्रशासनाने पुलावर काँक्रेटचा थर टाकला होता. मात्र आताच्या पुराच्या प्रवाहाने काँक्रेट पूर्ण वाहून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
समुद्रपूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पोथरा नदीला जोडणाऱ्या नाल्यावरील सिमेंट काँक्रीटचा पूल तुटलाने त्याचा काही भाग हा रस्त्यावर येऊन पडला आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून पायी जाण्याची देखील भीती निर्माण झाली असून गावाच्या बाहेर कामासाठी कसे जावे आणि विद्यार्थ्यांनी शाळा कशी गाठावी असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन -तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोनोरा ढोक या गावात मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं गावालगतच्या लाडकी नदीचा प्रवाह वाढून, नदीचे पाणी घरात शिरले आहे. यामुळं अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.