Wardha News : पोहायला गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू
Wardha Latest News : विहिरीत पोहण्याच्या नादात तरुणांचा बुडून मृत्यू, आर्वी तालुक्यातील दुर्दैवी घटनेने गावात शोककळा
Wardha Latest News : खेळायला जातो म्हणून दोन तरुण मुलं शनिवारी सायंकाळी घरून निघाले..मित्र सोबत असताना दोघांनाही विहिरीत पोहण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी विहिरीत पोहण्याचे ठरवले, त्यांनी विहिरीत सूर मारली आणि पोहता पोहता दोन्ही मुले खोल पाण्यात बुडाली आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. अखेर आज रविवारी त्यांचा मृतदेहच दिसल्याने दोघांच्याही कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला..या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे..आर्वी तालुक्यात ही घटना घडली. देवांश घोडमारे आणि योगेंद्र मानकर अशी मृत तरुणांची नावं आहेत.. ते दोघेही एकाच वर्गात असून इयत्ता नववीत शिक्षण घेत होते..
मुलं घरी आली नसल्याने घरच्यांनी गाठले आर्वी पोलीस ठाणे :
शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान आसोले नगर येथून देवांश घोडमारे वय (14) व योगेंद्र मानकर वय (14) हे दोघेही जिवलग मित्र असून घरून खेळायला जातो, असे सांगून गेले, मात्र उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तरी मुलं कुठंच सापडली नसल्याने घोडमारे व मानकर यांनी या घटनेची तक्रार आर्वी पोलीस स्टेशन येथे दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला गती देत तातडीने मुलांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. मोबाईलचे लोकेशन माठोडा-बेनोडा परिसर दाखविले असल्याने सर्व परिसरात खूप शोधाशोध झाली, परंतु मुलं कुठेच दिसून आली नाहीत. मुलं कुठंच दिसत नसल्यामुळे दोन्ही कुटुंबियांच्या जीवात जीव नव्हता..
रविवारी शेतशिवरातील विहिरीत दिसले मृतदेह :
आज रविवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान माटोडा - बेनोडा रोडवर काही अंतरावर असलेल्या पप्पू गुल्हाने यांच्या शेतातल्या विहिरीत मृतदेह आढळल्याने सर्व परिसरात खळबळ उडाली व या घटनेची माहिती आर्वी पोलिसांना देण्यात आली तसेच आर्वी पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळावर धाव घेऊन पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण केलं..मंगेश मेश्राम, वामन डेहनकर यांनी विहिरीत उतरून सुरुवातीला एका मुलाला बाहेर काढले. व दुसरा मृतदेह इलेक्ट्रिकच्या केबलला अडकला असल्याने बाहेर न आल्याने इलेक्ट्रिक केबल वर ओढताच मृतक दुसरा मुलगाही दिसून आला व त्यालाही बाहेर काढण्यात आले..त्यांच्या वस्तू, सायकल कपडे,चपला विहिरीबाहेर आढळून आले..थेट मुलांचे मृतदेह बघून एकच हंबरडा फोडला,दोन कुटुंबीयांनी एकाच वेळी दोन तरुण मुलं गमावल्याने गावात शोककळा पसरली आहे..संपूर्ण गाव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले आहे..
मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले:
घरून खेळायला जातो सांगून गेलेल्या तरुणांचा विहिरीत पोहताना बुडून मृत्यू झाला आहे.पाणी भरलेल्या विहिरीत आढळलेले हे दोन्ही तरुण मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे पाठवण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार असून दुःखद वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.. पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात सहनिरीक्षक वंदना, सोनवणे, उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, व इतर पोलिस करीत आहे.